नरेंद्र मोहिते राजापूर:
राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली व त्यानंतर नगर परिषदेतील अंतर्गत उपनगराध्यक्ष, स्विकृत नगरसेवक व विषय समिती सभापतीपदांच्या निवडणूकाही पार पडल्या. आता लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे आता राजापूर शहर वासीयांना शहराच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करून शहराचा विकास कसा व कधी होणार याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जिल्हयातील अन्य शहरांच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत काहीसे मागे पडलेले राजापूर शहर भविष्यात विकासाच्या प्रवाहात आणताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रसंगी राजकारण बाजुला ठेऊन शहराच्या सर्वांगिण विकासाला गती देण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच राजापूर शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेत यात शंका नाही. मात्र त्यासाठी नागरिकांच्या पाठपुराव्याबरोबरच राजकारण विरहित काम करण्याची आवश्यकता आहे.
तब्बल आठ वर्षांनी राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणूकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळविली आहे. निवडणूक होऊन निकाल लागून एक महिन्याचा कार्यकाळ पुर्ण झाला असून आता शहरवासीयांना विकासाची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे.
एकीकडे जिल्हयातील अन्य शहरे ही विकासाकडे झेपावत असताना राजापूर शहर मात्र विकासाच्या प्रवाहात मागे पडल्याचे चित्र आहे. राजापूर शहराच्या या काहीशा मागासेलपणामुळे राजापुर शहरात बदली झाल्यावर येण्यासाठी अनेक प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात ही सध्याची वस्तुस्थिती आहे. या गैरसोयींमध्ये अगदी शैक्षणिक, करमणूक यांसारख्या सुविधांबरोबरच आरोग्य सुविधेचा गंभीर प्रश्न आजही कायम आहे.
रस्ते, पाखाडया आणि सरंक्षण भिंतीपलिकडेही विकास असतो, शहरातील नागरिकांना, बाहेरून शहरात येणाऱ्या पर्यटकांसह अन्य जनतेला शहर आपलंस वाटावं, या राजापूर शहरात फेरफटका मारण्यासाठी आलं पाहिजे असं वाटावं असा राजापूर शहराचा विकास करायला हवा याची लोकप्रतिनिधींना जाणीव झाली पाहिजे तरच भविष्यात राजापूर शहर विकासाच्या प्रवाहात येईल.
राजापूर शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने भविष्यात गती द्यायाची असेल तर नागरिक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासाला नियोजनबध्द पध्दतीने गती देण्यासाठी प्ररत्न केले पाहिजेत. राजापूर शहरातील पुररेषेचा गंभीर प्रश्न गेली ४० वर्षे प्रलंबीत आहे. या पुररेषेमुळे नागरिकांना बांधकाम करता येत नाही आणि त्यामुळे मग आर्थिक विकासालाही खिळ बसत आहे. या पुररेषेची टांगती तलवार राजापूरवासीयांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
पुररेषेप्रमाणेच राजापूर शहराच्या विकासाला अडसर ठरलेला आणखी एक मुद्दा म्हणजे देवस्थान इनाम जागा. या देवस्थान इनाममुळे त्या जागेवरिल नागरिकांना कोणतेही बांधकाम करता येत नाही, जागेवर तारण होत नसल्याने व्यवसाय करता येत नाही अशी अवस्था आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
राजापुर शहरात पावसाळयात पूर आणि उन्हाळयात पाणीटंचाई हे चित्र बदलले पाहिजे. नव्याने होत असलेले कोदवली येथील पर्यायी धरण व नव्या डीपीआर प्रमाण सुरू असलेले अंतर्गत जलवाहिनेचे काम यातुन भविष्यात नक्कीच हा प्रश्न निकाली निघेल, मात्र यासासाठीही भविष्यातील शहराचा विचार करून काम होणे आवश्यक आहे.
शहरातील वाहतुक कोंडी हा गेल्या कित्येक वर्षातील ज्वलंत असा प्रश्न आहे. या वाहतुक कोंडीतुन नागरिक व वाहन चालकांची सुटका व्हावी यासाठी कोणतेच प्रयत्न झालेल नाहीत. त्यामुळे बाहेरून येणारे अनेक पर्यटक या वाहतुक कोंडीमुळे शहराकडे येत नाहीत. या वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी भविष्यात नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर होतो, त्यामुळे याबाबतही नियोजन करणे आवश्यक आहे. शहराच्या विकासाला गती देताना भविष्यात भुयारी गटार, भूमिगत विजवाहिन्या टाकणे याबाबतही नियोजन होणे आवश्यक आहे.
राजापूर शहराची बाजारपेठही दिवसेंदिवस ओस पडत आहे, या बाजारपेठेला उर्जींतावस्था येण्यासाठीही काही करता येईल का या दृष्टिने नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी व्यापारी, नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
राजापूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, स्वच्छतेचा प्रश्न शहरातील सर्व प्रभागांमध्ये पथदिप व्यवस्था यासांरख्या प्राथमिक सेवा सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील याबाबतही लक्ष देणे आवश्यक आहे.
आमदार किरण सामंत हे जिल्हयाच्या राजकारणातील एक अग्रगण्य असे नाव आहे. त्यांनी कायमच विकासाच राजकारण केलेले आहे. त्यामुळे राजापूरचे आमदार म्हणून काम करताना शहराच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष घातलेले आहे. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आलेल्या एड. हुस्नबानू खलिफे यांनी देखील शहराच्या विकासाला गती देण्याचा जो प्रयत्न केला तो शहरवासीय आजही विसरलेले नाहीत. त्यामुळे अशा विकासाची दुरदृष्टी असलेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन शहराचा विकास करून घेण्याची जबाबदारी ही निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांबरोबरच नागरिकांची आहे. आणि भविष्यात जर तसे झाले, राजकारण बाजुला सारून सगळयांनी काम केले तर राजापूर शहराचा विकास दूर नाही हे मात्र नक्की.












