​सावंतवाडीत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे १२ अर्ज अवैध

एकूण १२४ उमेदवार अद्यापही रिंगणात : २७ तारीखला होणार चित्र स्पष्ट

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १६१ अर्जांपैकी १२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठीचे ५ आणि पंचायत समितीचे ७ अर्ज बाद झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली.

सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी दाखल ५९ अर्जांपैकी ५ अर्ज अवैध ठरले, तर पंचायत समितीच्या १०२ अर्जांपैकी ७ अर्ज बाद झाले. तांत्रिक त्रुटी, सूचकाची स्वाक्षरी नसणे किंवा कागदपत्रांची अपूर्णता यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कोलगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, कलंबिस्त आणि मळगाव मतदारसंघातील काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

​एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज भरले असल्यास त्यांचा एकच अर्ज वैध धरण्यात आला आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेसाठी ४३ आणि पंचायत समितीसाठी ८१ असे एकूण १२४ उमेदवार शिल्लक आहेत.

आता​ २७ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. या दिवशी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, यावरूनच निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवारांची संख्या आणि प्रत्यक्ष लढत स्पष्ट होईल. सध्या तरी माजगाव, कोलगाव, तळवडे, आंबोली आणि मळेवाड मतदारसंघांत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. जागावाटपामुळे झालेली बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांचा पवित्रा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.