प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांची असनिये शाळेला भेट

विद्यार्थ्यांशी साधला संवाद : मालवणी शैलीत घातले ‘गार्‍हाणे’ 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी आज श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये या प्रशालेस सदिच्छा भेट दिली. एका मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ते असनिये गावात आले होते, त्यावेळी त्यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

‘वस्त्रहरण’ नाटकातील तात्यांची भूमिका समर्थपणे साकारून घराघरात पोहोचलेल्या नाईक यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत फोटो आणि स्वाक्षरी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी खास मालवणी शैलीत ‘गार्‍हाणे’ घातले. यावेळी त्यांनी आपली मालवणी भाषेबद्दलची ओढ व्यक्त करताना सांगितले की, जिथे संधी मिळेल तिथे ते मालवणी भाषेचा आवर्जून वापर करतात.

दिगंबर नाईक यांनी आतापर्यंत ‘विच्छा माझी पूरी करा’, ‘भटाच्या साक्षीने’, ‘मिस्तर नामदेव म्हणे’, ‘लाडीगोडी’ यांसारख्या अनेक नाटकांमधून आणि ‘गाव गाता गजाली’, ‘फू बाई फू’, ‘बिग बॉस’ यांसारख्या कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

निसर्गरम्य असनिये गावातील या शाळेला भेट देऊन आपल्याला विशेष आनंद झाला, असे त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सावंत मॅडम, श्री. संजय सावंत, श्री. राठोड सर, श्री. देसाई सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.