देवगड : शुल्लक कारणातून मारहाण

देवगड / प्रतिनिधी

शुल्लक कारणावरून झालेल्या वादात लोखंडी व्हिलपाना डोक्यावर मारून एकाला दुखापत केल्याप्रकरणी किंजवडे देऊळवाडी येथील मनोज मधुकर किंजवडेकर (वय ४०) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास किंजवडे ते आंबोळ व्हाळ या रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंजवडे देऊळवाडी येथील प्रशांत कृष्णा परब (वय ३८) हे गुरुवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास किंजवडे ते आंबोळ व्हाळ या रस्त्यावर त्यांच्या घरासमोर आपली चारचाकी वाहन दुरुस्त करीत होते. यादरम्यान तेथे आलेल्या मनोज किंजवडेकर या संशयिताने प्रशांत परब यांच्याशी गाडीचे काम करीत असलेल्या जागेवरून हुज्जत घालत ‘जागा फुकट पडली आहे का?’ अशी विचारणा केली. तसेच त्यांना शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या वादात संशयिताने आपल्या ताब्यातील रिक्षेमधील लोखंडी व्हिलपाना काढून प्रशांत परब यांच्या अंगावर धावत जात व्हिलपान्याने त्यांच्या डोक्यावर मध्यभागी मारून त्यांना दुखापत केली. या घटनेची फिर्याद प्रशांत परब यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून फिर्यादीनुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८, ११५ (२), १३१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.