राजापूर (प्रतिनिधी) कोकणातील तरुण आंबा आणि काजूवर अवलंबून न राहता आता बांबू लागवडीकडे वळला तर हे पीक अधिक फायदेशीर ठरेल. बांबू शेती आणि त्यावर आधारित उद्योगांमुळे कोकणातील स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी व्यक्त केला. राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे रविवारी (दि. १ फेब्रुवारी) जिल्ह्यातील पहिल्या बांबू डेपोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप आणि महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशन (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने कोळवणखडी येथील श्री. सुहास मोरे यांना मंजूर करण्यात आलेल्या ‘माऊली बांबू डेपो’चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या डेपोचे उद्घाटन बांबू अभ्यासक सौ. सरोजिनी पाटलोबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी पुष्पहार अर्पण करून डेपो शेतकऱ्यांच्या सेवेसाठी खुला केला.
५० डेपो उभारण्याचे उद्दिष्ट
आपल्या मनोगतात म्हेत्रे पुढे म्हणाले की, “राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप आणि सुहास मोरे यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यात केवळ हा एकच डेपो न राहता असे किमान ५० डेपो उभे राहावेत. यासाठी पंचायत समिती पूर्ण सहकार्य करेल. बांबू लागवड आणि उद्योग प्रशिक्षणासाठी लवकरच ३-४ गावांचा मिळून किंवा पूर्ण पंचायत समिती स्तरावर भव्य मेळावा आयोजित करण्यात येईल. परप्रांतीय आपल्याकडे येऊन काजू-आंबा व्यवसायात संधी शोधतात, मग आपल्या तरुणांनी मागे का राहावे? त्यांनी या संधीचे सोने करावे.”
बांबूच्या मूल्यवर्धनावर भर
कोल्हापूर येथील बांबू अभ्यासक पाटलोबा पाटील यांनी सांगितले की, १८ सप्टेंबर २०२५ पासून राजापूर बांबू ग्रुपचे काम अविरत सुरू आहे. हेच मॉडेल महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशनच्या माध्यमातून इतरत्र पोहोचवले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या पहिल्या बांबू डेपोमुळे अनेक नवीन उद्योगधंदे सुरू होतील. बांबूचा ३० टक्के भाग वाया जातो, त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी आपण भविष्यात मार्गदर्शन करत राहू.
बांबू डेपोची संकल्पना आणि पार्श्वभूमी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपचे अध्यक्ष सुहास मोरे यांनी डेपो स्थापनेची संकल्पना मांडली. ते म्हणाले की, “महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरीराज यांनी ५ व ६ जानेवारी रोजी राजापूरला भेट देऊन स्थानिक माणगा, बोरबेट, माना जातीच्या बांबूंची पाहणी केली होती. पाटलोबा पाटील त्यांच्या आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर रावराणे यांच्या मार्गदर्शनामुळेच हा डेपो उभा राहिला आहे. कोकणातील बांबू व्यापाऱ्यांनी सुद्धा स्वतःचे डेपो सुरू केल्यास त्याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना नक्कीच होईल.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला कोळवणखडीचे सरपंच प्रवीण रहाटे, माजी सरपंच सुभाष गुरव, माजी सैनिक वासुदेव घाग, अब्दुलगणी लांजेकर (ओझर), सचिव सदाशिव सरखोत, शिवाजीदादा मोरे, राजू साळवी (सौंदळ), संजय मांजरे, अशोक गुरव, काशिनाथ मोरे, शेखर गांगण, नागेश बने, संतोष गुरव, सुधाकर गुरव तसेच ओझर, सौंदळ, येळवण, मूर, अडवली, तिवरे, पटवली आणि रायपाटण येथील ग्रामस्थ व बांबू शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












