शिरोडा नाका परिसरातील थरार : बघ्यांची मोठी गर्दी
सावंतवाडी । प्रतिनिधी :शहरातील शिरोडा नाका येथील रहिवासी मुद्राळे यांच्या विहिरीत पडलेल्या एका रानडुकराला वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने बाहेर काढले. रेस्क्यू ऑपरेशननंतर या रानडुकराला सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरात असलेल्या मुद्राळे यांच्या विहिरीत रविवारी पहाटे एक रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास आले. विहिरीत पाणी असल्याने आणि विहीर खोल असल्याने डुकराला बाहेर पडणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील आणि वनपाल प्रमोद राणे यांच्या देखरेखीखाली रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले.
जलद कृती दल प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विहिरीत उतरून रानडुकराला सुरक्षितपणे जाळ्यात जेरबंद केले. डुकराला कोणतीही इजा होऊ न देता विहिरीबाहेर काढण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, मात्र वनविभागाने चोख बंदोबस्त राखत ही मोहीम फत्ते केली.
या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शुभम कळसुलकर, देवेंद्र परब, कृष्णा पारधी, वनरक्षक सुशांत चौथे, राजेंद्र गावडे, महादेव (नाना) तावडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर रानडुकराची प्राथमिक तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल मुद्राळे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.













