आंबोली घाट मार्गातील गटार खोदण्याचे काम सुरू

काका भिसे यांच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व कोल्हापूर तसेच बेळगाव यांना जोडणारा मुख्य दुवा असलेल्या व वर्षा पर्यटनामूळे पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या आंबोली घाटात ठिकठिकाणी गटारच अस्तित्वात नसल्यामुळे पावसाचे तसेच छोट्या-मोठ्या धबधब्यांचे ज पाणी रस्त्यावरून दरीच्या दिशेने जात असल्यामुळे दरीलगतचे संरक्षक कठडे कोसळून घाट रस्ता तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते काका भिसे यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर घाटमार्गाच्या लगत असलेले हे गटार साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

आंबोली घाटात एका बाजूला उंच उंच कडे तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असा घाट मार्ग आहे. या उंच कड्यांच्या बाजूने रस्त्यालगत पावसाचे तसेच धबधब्यांचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदण्यात आलेली कटारे अलीकडच्या काळात पूर्णपणे बुजून गेली आहेत. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावरूनच वाहत दरीच्या दिशेने जात असल्यामुळे ठीक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर सातत्याने हे सुरू राहिल्यामुळे दरीच्या बाजूने असलेल्या घटना कोसळून घाट मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबीकडे काका भिसे यांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने हे गटार साफ करून पूर्ववत करण्याचे काम सद्यस्थितीत हाती घेतले आहे. गटार साफ झाल्यामुळे पावसाचे तसेच लहान मोठ्या धबधब्याचे पाणी डोंगरकड्याच्या दिशेने वाहत जाऊन मोठ्या नाल्यांमधून साकवाखालून दरीच्या दिशेने गेल्यामूळे रस्ते तसेच संरक्षक कठडे नांदुरुस्त होण्याची भीती दूर होणार आहे. आंबोली घाटमार्गाच्या सुरक्षेत्रेसाठी काका भिसे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्रामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली त्याबद्दल काका भिसे यांचे स्थानिकांमधून अभिनंदन होत आहे.