खेड तालुका भगवामय; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

खेड | प्रतिनिधी
राकेश कोळी
(खेड प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत शिवसेनेने मोठे यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेसाठी असलेल्या सात जागांपैकी शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवला असून उर्वरित एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विजयी झाली आहे. भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत खाते उघडता आलेले नाही.
जिल्हा परिषद सुकिवली गटात शिवसेनेचे सचिन विश्राम धाडवे यांनी ६८५१ मते मिळवत स्पष्ट विजय नोंदवला. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामचंद्र आखाडे यांना २६२९ मते मिळाली. भरणे गटात शिंदे सेनेच्या मानसी जगदाळे यांनी ६४७६ मते मिळवत विजय मिळवला, तर उद्धव सेनेच्या सुहासिनी चिंचघरकर यांना २४५७ मते मिळाली. भडगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे अजय बिरवटकर यांनी ७११९ मते मिळवत विजय संपादन केला, तर शिंदे सेनेचे रवींद्र रेवाळे यांना ६१०७ मते मिळाली.
दयाळ गटात शिंदे सेनेचे अरुण कदम यांनी ६४५८ मते मिळवत विजय मिळवला. या गटात उद्धव सेनेचे अजिंक्य मोरे यांना ४४३८ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवारांमध्ये विजय राक्षे यांना ११४४, चंद्रसेन मोहिते यांना १५८ आणि इनायतुल्ला अब्दुल रहिमान यांना १४३ मते मिळाली. विराचीवाडी गटात शिंदे सेनेच्या रेवती पाटील यांनी ५४२१ मते मिळवत विजय मिळवला. या गटात उद्धव सेनेच्या स्पृहा चांदिवडे यांना ३२५४ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या अंजली खापरे यांना २०४५ मते मिळाली.
लोटे जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेच्या आदिती खाडे यांनी ४२१२ मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेच्या अंकिता सोलकर यांना ४१५९ मते मिळाली, तर भाजपच्या मनाली कांबळी यांना २९७२ मते मिळाली. धामणदिवी गटात शिंदे सेनेच्या जाई आंब्रे यांनी ५२४२ मते घेत विजय मिळवला. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या सानिका आंब्रे यांना ३५९६ मते, तर उद्धव सेनेच्या प्रीती मनवळ यांना २९८८ मते मिळाली.
दरम्यान पंचायत समिती निवडणुकांतही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. सुकीवली गणात शिवसेनेच्या सुनिता कासार यांनी ३४५९ मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेच्या सुनिता गोमले यांना १२०२, तर भाजपच्या दिव्या होळकर यांना ६३७ मते मिळाली. तिसंगी गणात शिवसेनेचे महेश भोसले यांनी २८१२ मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी उद्धव सेनेचे किशोर जाधव यांना ५३९, भाजपचे ऋषिकेश मोरे यांना ८८५, तर काँग्रेसचे चंद्रकांत मोरे यांना ७२ मते मिळाली.
खवटी गणात शिवसेनेच्या नम्रता तांबट यांनी २७६८ मते घेत विजय मिळवला, तर उद्धव सेनेच्या सुहासिनी चिंचघरकर यांना १५३० मते मिळाली. भरणे गणात शिवसेनेचे प्रशांत चव्हाण यांनी २८७४ मते मिळवत विजय मिळवला. या गणात भाजपचे विजय दरेकर यांना ९७६, उद्धव सेनेचे सचिन निकम यांना ६१३, बसपाचे मिलिंद गमरे यांना १८६ आणि मनसेचे प्रशांत मंडलिक यांना ३८ मते मिळाली.
भडगाव गणात शिवसेनेचे संग्राम कदम यांनी ३७८२ मते मिळवत विजय नोंदवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुलदीप पवार यांना २३७४ मते मिळाली. जामगे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपूर्वा जाधव यांनी ३९४६ मते मिळवत विजय मिळवला, तर शिवसेनेच्या नयना मोरे यांना ३०८१ मते मिळाली. दयाळ गणात शिवसेनेच्या शमिका म्हादे यांनी २१५८ मते मिळवत विजय मिळवला. येथे अपक्ष उमेदवार साक्षी पालकर यांना १९२१, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साबीहा दुदुके यांना ११४२ आणि उद्धव सेनेच्या स्वाती कदम यांना १०३२ मते मिळाली.
बहिरवली गणात शिवसेनेचे निसार सुर्वे यांनी ३०३८ मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेचे बशीर हमदुले यांना २११२, काँग्रेसचे अजीम सुर्वे यांना ४०२ आणि अपक्ष बाळकृष्ण पानवलकर यांना ३७९ मते मिळाली. गुणदे गणात शिवसेनेचे सुनील मोरे यांनी २२७० मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे संजय आखाडे यांना १०९०, उद्धव सेनेचे विष्णू आंब्रे यांना ७१२, मनसेचे प्रकाश पालांडे यांना ५९ आणि वंचित बहुजन आघाडीचे बबन जाधव यांना ६६ मते मिळाली.
विराचीवाडी गणात शिवसेनेचे दिलीप डेरवणकर यांनी २७५३ मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेचे संदेश धुळप यांना १६६४, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश देवरुखकर यांना १३१६ आणि काँग्रेसचे मधुकर शिंगे यांना २३२ मते मिळाली. लोटे गणात उद्धव सेनेचे अजय चाळके यांनी २३८४ मते मिळवत विजय मिळवला, तर शिवसेनेचे जीवन आंब्रे यांना २३७०, भाजपचे अविनाश आंब्रे यांना १२८६ आणि अपक्ष विपुल तांबे यांना ११० मते मिळाली.
आंबडस गणात उद्धव सेनेच्या अमिता बने यांनी १७४९ मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या सीमा सकपाळ यांना १७०५, भाजपच्या मेघना मोरे यांना १६१८ आणि अपक्ष दिपाली हुमणे यांना १४४ मते मिळाली. आंजणी गणात शिवसेनेच्या अफिया पालेकर यांनी २०५२ मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेच्या ताजबेगम देसाई यांना १७२४, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकांक्षा मोरे यांना १४६४, वंचित बहुजन आघाडीच्या अभिलाषा जाधव यांना ३४२ आणि काँग्रेसच्या राबिया जसनाईक यांना १३१ मते मिळाली.
धामणदेवी गणात उद्धव सेनेच्या रेवती घाग यांनी २०८५ मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समृद्धी गोठल यांना २०१८, तर शिवसेनेच्या नंदिनी पवार यांना १९२६ मते मिळाली.
या निकालांमुळे खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिव सेनेचे वर्चस्व स्पष्ट झाले असून ग्रामीण मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे हे ठळकपणे समोर आले आहे. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव राहणार आहे.