देवगड / प्रतिनिधी :दहिबाव-तांबळवाडी येथून २३ डिसेंबर २०२५ रोजी अपहरण झालेल्या दोन वर्षीय बालिकेचा शोध लावण्यात देवगड पोलिसांना यश आले आहे. त्या बालिकेला मुंबई वसई येथून ताब्यात घेण्यात आले. बालकल्याण समिती, सिंधुदुर्ग यांच्या समक्ष त्या बालिकेला देवगड पोलिसांनी तिच्या आईच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणात संशयिताच्या आईलाही सहआरोपी करण्यात आल्याची माहिती देवगड पोलिसांनी दिली. या अपहरण प्रकरणात कोल्हापूर खंडपीठात दुर्मीळ अशी ‘हेबियस कॉर्पस’ याचिका पीडित मातेने अॅड. कौस्तुभ मराठे यांच्यामार्फत दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा जलद तपास झाला आहे.
देवगड पोलिसांनी बालिका अपहरण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर, पोलीस कर्मचारी विश्वास पाटील (चालक) यांच्या पथकाने मुंबई वसई येथे जात संशयिताकडून बालिकेला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने देवगड पोलिसांनी यशस्वी केला.












