ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक; देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील साडवली पंचायत समिती गणातील शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार क्षमा संतोष जाधव यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार काल रात्री घडल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. या संतापजनक प्रकाराबाबत देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, बॅनर फाडण्यात आल्याची बातमी कानावर येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत साडवलीत एकत्र जमा होण्यास सुरूवात केली. तर झाल्या प्रकाराबाबत ठाकरे गटाचे श्री. अजित उर्फ छोट्या गवाणकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, विजयी उमेदवाराचे अभिनंदन करणारे बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार घडल्याने साडवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.











