चिपळुणात धोकादायक पुलाला लोखंडी अँगलचा टेकू

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट परिसरातील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगने दिला आहे. त्यामुळे सध्या सुमारे २ लाख ५० हजार रुपये खर्च करून त्याला लोखंडी अँगलचा टेकू दिला जात आहे. तसेच नव्या पुलाचा आराखडा तयार केला जात असून पावसाळा संपताच कामाला सुरुवात होणार आहे.
गोवळकोट मार्गावर असलेला हा पूल ब्रिटीशकालीन आहे. या परिसरात मोठ्याप्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याने या पुलावरून वाळू भरलेले दोन, चार ब्रास क्षमतेचे डंपर, ट्रक, जेसीबी, टॅक्टर, नगरपरिषदेच्या घंटागाड्या, बसेस अशी शेकडो लहान-मोठी वाहने दिवस-रात्र धावत असतात. त्यातच या पुलाला अनेक वर्षे झाली असल्याने तो आता धोकादायक झाला आहे. पुलाला असलेली लॉकींग सिस्टीम नादुरुस्त झाली असून लॉक तुटली आहेत. त्यामुळे तो कधीही धोका देऊ शकतो. याबाबत सातत्याने तक्रारी झाल्याने नगरपरिषदेने त्याचे वालचंद कॉलेजकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेतले. त्यानुसार हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल या कॉलेजने दिला असून तात्पुरत्या स्वरुपात काही दुरुस्त्या सुचल्या आहेत.