नाविन्यपूर्ण उपक्रमात उज्वल यश मिळवणारी तालुक्यातील पहिली शाळा !

फोंडाघाट/ कुमार नाडकर्णी— शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या MSCIT च्या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा फोंडा-गांगोवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले आहे.प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.गणपती कमळकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील ज्या शाळांना संगणक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे,तेथे निवडक विद्यार्थ्यांना MSCIT च्या परीक्षेस बसविण्यात आले होते.
यामध्ये जि.प.पू.प्रा. शाळा फोंडा गांगोवाडीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत धवल यश प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यामध्ये कु .जानवी गजानन सावंत – ९६%, कु. निशिका निलेश लाड-९०%, मंथन संजय जोईल-८८%, करण रामचंद्र गोसावी-८६%, शिवम् ध्रुवबाळ गोसावी-८२% अशी या यशाचे मानकरी आहेत. या कामी शाळेच्या शिक्षिका श्रीम.विद्या अंकुश कातखडे यांनी विशेष मेहनत घेतली. या कामी केंद्र इनसाईट कॉम्प्युटर, फोंडा यांचे अनमोल सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यश मिळवणारी फोंडा-गांगोवाडी ही कणकवली तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.
या यशाबद्दल या उपक्रमाचे प्रेरणास्थान शिक्षणाधिकारी श्री. गणपती कमळकर, केंद्रप्रमुख श्री.सुभाष महाले ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. दर्शना ठाकूर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. गजानन सावंत व सर्व सन्माननीय सभासद यांनी तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद,पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे…












