लोककला हा मराठी संस्कृतीचा आत्मा

माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे प्रतिपादन, तीन दिवसीय नमन महोत्सवाचा समारोप

चिपळूण (वार्ताहर ): आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे पारंपरिक लोककलांकडे दुर्लक्ष होत आहे. या कला जिवंत ठेवून समृद्ध लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नमन महोत्सव ही काळाची गरज आहे. लोककला या संस्कृतीचे दर्शन घडवतात. लोककला हा आपला आत्मा आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले.

सांस्कृतिक कार्यविभाग, सांस्कृतिक संचलनालयामार्फत येथील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित नमन महोत्सव समारोपप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, लोककला हा आपला आत्मा आहे. या कला टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात लोककला जिवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असून लोककला महोत्सवाद्वारे युवा पिढीला प्रोत्साहन देणे
आवश्यक असल्याचेही सांगितले.

नमन महोत्सवात कोकणातील कलाकारांनी आधुनिक युगातही नमन कला किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून दिले. ग्रामीण भागातील संस्कृती आणि लोकगीते शहरासारख्या ठिकाणी ऐकणे हा रसिकांसाठी एक सुवर्ण योगच होता, असे गौरवोद्‌गार काढत लोककलेला जीवंत ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही शेवटी सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी बुटाला, राजवैभव नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, भाजप युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलींद नांदगावकर, पी टी. कांबळे, माजी नगराध्यक्षा गौरी पुळेकर, अंकुश मिर्लेकर, सर्वेश पवार, नंदकिशोर जुवेकर आदी उपस्थित होते. सलग तीन दिवस रंगलेल्या नमन महोत्सवात नमन मंडळांकडून लोककलेचा जागर करण्यात आला. रसिकांनीही नमन महोत्सवाला हजेरी लावली होती.

लोककला हा मराठी संस्कृतीचा आत्मा असून लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजन होत असल्याने या पारंपारिक लोककलांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी केले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालन विभाग आयोजित नमन महोत्सवात जिल्ह्यातील एकूण ८ नमन मंडळे सहभागी झाली होती. तीन दिवस सहभागी झालेल्या सर्व नमन मंडळांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.