दक्षिण कोकणची काशी ‘श्रीदेव कुणकेश्वर’ यात्रोत्सवास प्रारंभ; १७ फेब्रुवारीला तीर्थस्नानाची महापर्वणी

यात्रोत्सवाचे नेटके नियोजन

देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. १५ ते १७ फे्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावास्या महापर्वणी तिर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे.कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पुर्णत्वास गेली असून शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वरक्षेत्री वळू लागली आहेत.

कुणकेश्वर जत्रोत्सवाला आजपासुन प्रारंभ होत आहे.यात्रोत्सवाची तयारी पुर्णत्वास गेली असून देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. एस्टी, वीजवितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दुरसंचार आदी सर्व विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे.यात्रेच्या पार्श्वभुमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील याठिकाणी उभारले आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई,हॉटेल्स,मालवणी खाजा,कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलुन गेला आहे.या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारे मोठ्या विक्रीस आली आहेत.तसेच कुणकेश्वरच्या समुद्रकिनारही भेल,आईस्क्रीम इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारे दुकानाने भरून गेलेले दिसून येत आहेत.

दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतुक कोंडी कमी प्रमाणात होईल.तीन ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.तारामुंबरी मिठमुंबरी पुल मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजिक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागर समोर, आचरा मिठबांव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे.यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलीसांचे टेहळणी पथक व देवस्थान ट्रस्टच्या स्वंसेवकांचे पथक कार्यरत आहे.त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

कुणकेश्वर भेटीसाठी जाणार ५ देवस्वाऱ्या
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी ५ देवस्वाऱ्या जाणार आहेत.यामध्ये श्री देव लिंगेश्वर पावणाई देवस्थान जानवली कणकवली, श्री देव नागेश्वर पावणादेवी नागवे कणकवली, श्री पावणाई रवळनाथ देवस्थान मालोंड बेलाचीवाडी मालवण, श्री देव गांगेश्वर देवस्थान नारींग्रे देवगड या देवस्वाऱ्यांचा समावेश आहे.

चोख पोलिस बंदोबस्त
कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक अप्पर पोलिस अधिक्षक, दोन उपविभागी पोलिस अधिकारी, ५ पोलिस निरिक्षक, २१ सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक, १०९ पोलिस अंमलदार, १० वाहतुक पोलिस व १०७ होमगार्ड असा २५५ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

२३ एसटी गाड्यांचे नियोजन
देवगड आगारातून २३ गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देवगड आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली.यामध्ये देवगडमधून ११, नांदगांव २, पोयरे खुडी नारींग्रे १, शिरवली चौकेवाडी १, नाद ओंबळ १, आयनल कोळोशी १, किंजवडे डोबवाडी १, आरे निरो १ अशा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.