जातीपातीच्या भिंती भेदून दळे गावात जपली ‘माणुसकी’; वयोवृद्ध निराधार महिलेला तडवी कुटुंबाचा मायेचा आधार

कलावती मिरगुले

जैतापूर (वार्ताहर): राजकारणात जातीपातीच्या नावाखाली समाजमन कलुषित करण्याचे प्रयत्न होत असतानाच, राजापूर तालुक्यातील दळे गावात माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले आहे. एका बेघर आणि निराधार हिंदू वयोवृद्ध महिलेला एका मुस्लिम तडवी कुटुंबाने दिलेला आधार आणि तिच्या मृत्यूनंतर सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पार पाडलेले अंत्यविधी, ही घटना आजच्या काळात समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे.

दळे गावातील कलावती केरू मिरगुले एक वयोवृद्ध महिला, जिच्याकडे कोणताही ओळखीचा पुरावा नव्हता आणि माहेर-सासर असूनही ती पूर्णपणे आधारविहीन होती, अशा कठीण प्रसंगात गावातील एका तडवी (मुस्लिम) कुटुंबाने तिला आपल्या हक्काच्या घरात आश्रय दिला. केवळ निवाराच नव्हे, तर पोटच्या लेकराप्रमाणे तिची सेवा, शुश्रूषा आणि सन्मान या कुटुंबाने जपला.

काही दिवसांपूर्वी ही महिला आजारी पडली असता, शेजाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु अनेक तथाकथित समाजसेवकांनी आणि नातेवाईकांनी याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. दरम्यान, जैतापूरचे सामाजिक युवा कार्यकर्ते जब्बार काझी यांनी स्वतःच्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले असतानाही, स्वतःचे दुःख बाजूला सारून या महिलेसाठी सर्व रुग्णालयीन प्रक्रिया आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
उपचारानंतर प्रकृती खालावल्याने या माऊलीचे राहत्या घरी निधन झाले. मृत्यूनंतर तिचा देह सासरच्या गावी नेण्यासाठी जब्बार काझी आणि शेजाऱ्यांनी रूग्णवाहिकेची व्यवस्था केली, तर सासरच्या कुटुंबाने त्या वाहनाचे भाडे देऊन आपली जबाबदारी पार पाडली. शेवटी, सासरच्या गावातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईक पुढे आले आणि धार्मिक रितीरिवाजांनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

“निवडणुकीच्या काळात अनेकजण जातीपातीचे राजकारण करून समाजात भिंती उभ्या करतात. मात्र, संकटाच्या वेळी धावून जाणे आणि जात-पात न पाहता एकमेकांना साथ देणे हीच खरी माणुसकी आहे. दळे गावातील या घटनेने समाजाला नवा विचार दिला आहे.” जातीपेक्षा ‘माणूसपण’ मोठे असते, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले असून संपूर्ण तालुक्यात या तडवी कुटुंबाचे आणि जब्बार काझी यांचे कौतुक होत आहे.