आदर्श विद्यामंदिर चिवेली येथील दहावीच्या मुलांना दिला निरोप

विद्यार्थी झाले कार्यक्रमाच्या वेळी भावूक

चिपळूण(वार्ताहर ) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन ॲड संतोष कुळे होते.

प्रथम दीप प्रज्वलन आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन गुरव आणि इतर शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले

शालेय समितीचे चेअरमन पत्रकार ॲड संतोष कुळे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचा केलेला आदर्श विद्यालय मंदिर चिवेली येथील शैक्षणिक प्रवास स्वतः कागदावरती उतरवा . म्हणजेच आयुष्याच्या पटलावरती कुठल्याही क्षणी मनाला आनंद देऊन जाईल. तुम्हाला नेहमीच तो वाचताना तुमच्या मनाला स्पर्श करून ते अनमोल क्षण जातील. नेहमी डायरी लिहिण्याची सवय ठेवा. आयुष्यात तुमचे स्वतःचे एक असे लिखाण संग्रहित होईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट आठवणींचा ठेवा तुमच्या सोबत राहील. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीत आरोग्य चांगले ठेवा आणि पेपर छान लिहा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी आणि नववी येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा दहावीच्या मुलांच्या बद्दल आपले विचार व्यक्त करत त्यांना निरोप समारंभ संदर्भात शुभेच्छा दिल्या. यानंतर ग्राम समिती अध्यक्ष सुभाष शिर्के यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन गुरव यांनी सुद्धा शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांचा सहवास कसा लाभला आणि सहवासातील आठवणी व विद्यार्थी शिक्षकांच्या नात्याला त्यांनी भावनिक स्पर्श केला. शिक्षक श्री अत्तार आणि श्री आंब्रे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सल्लागार अशोक वनगे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी शमिका पडवळ यांनी केले.