गडकोट संवर्धनातून शिववंदना : ज्ञानदीप फार्मसी महाविद्यालयाकडून किल्ले रसाळगड प्लास्टिकमुक्त

खेड (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधत केवळ जल्लोष न करता इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे हीच खरी शिवभक्ती असल्याचा संदेश ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाने कृतीतून दिला आहे. महाविद्यालयाच्या वतीने नाजीक परिसरातील ऐतिहासिक किल्ले रसाळगड येथे विशेष स्वच्छता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गडावर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत संपूर्ण गड परिसर स्वच्छ केला. मोहिमेदरम्यान गडाच्या वाटा, बुरुज, तटबंदी आणि आजूबाजूच्या भागात साचलेला सुमारे दहा बॅग प्लास्टिक कचरा, पॅकेट्स आणि रॅपर्स गोळा करण्यात आले. संकलित कचरा पुढील योग्य विल्हेवाटीसाठी ‘घेरा रसाळगड’ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे सुपूर्द करण्यात आला.

या उपक्रमातून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा ठोस संदेश समाजात गेला असल्याचे मत घेरा रसाळगडचे सरपंच श्री. शरद गायकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहिम न राहता सातत्याने जोपासली जाणारी जबाबदारी ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण मोहिमेचे नेटके नियोजन प्रा. सुमेध घोडके यांनी केले होते. यावेळी डॉ. विपुल संसारे, प्रा. सारंग भारती, शिक्षकेतर कर्मचारी सुशांत बोथरे, अभिषेक देवळे तसेच द्वितीय व तृतीय वर्षातील सुमारे ३५ विद्यार्थी उपस्थित होते. मोहिमेसाठी बसची सोय श्री. रामचंद्र मोरे यांनी उपलब्ध करून दिली. घेरा रसाळगड ग्रुप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंदजी तोडकरी, सेक्रेटरी श्री. माधवजी पेठे, अनिलजी शिवदे, रुपला पाटणे, दीपकजी लढ्ढा, प्रकाश गुजराथी आणि सर्व सदस्यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी सांगितले की, महाविद्यालय यापुढेही अशाच स्वरूपाच्या गडकिल्ले स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जाणीव आणि इतिहासाबद्दल आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.