भांबेड शाळा नं. २ व अंगणवाडी पेठदेव चा वार्षिक सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील भांबेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेड नं.२ व अंगणवाडी पेठदेव यांचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध लोकगीते, बालगीते आणि देशभक्तीपर गितांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास भांबेड बीटच्या विस्तार अधिकारी सौ. समृद्धी खडपे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दुर्वा गांगण, भांबेड गावच्या माजी सरपंच सौ. मयुरी गांगण, माजी उपसरपंच श्री.राजेंद्र गांधी, हर्दखळे केंद्रप्रमुख प्रकाश बंडबे, प्रभानवल्ली केंद्रप्रमुख संतोष पडवणकर, विलवडे केंद्रप्रमुख चंद्रकांत कांबळे, विषयतज्ज्ञ हर्षे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला बोलताना भांबेड बीटच्या विस्तार अधिकारी सौ. समृद्धी खडपे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सामूहिक नृत्य, देशभक्तीपर गीत, लोकनृत्य तसेच सामाजिक संदेश देणारी एकांकिका सादर केली. “गजानना गजानना”, “माऊली माऊली”, “संदेसे आते हैं”, “शिवकन्या”, “स्वर्गात आकाशगंगा”, “बम बम बोले”, “ओम शांती ओम”, “चिऊताई चिऊ”, “इतनी सी हसी”, “आई मला खेळायला जाऊ दे”, “पिंगा गं पोरी पिंगा”, “मंगळागौर”,“दैवत छत्रपती”, “लुंगी डान्स”, “साधी भोळी माझी आई”, “गोंधळ मांडीला”, “वेसावची पारू”, “कोळीवाड्याची शान”, “महाराष्ट्रातील सण- उत्सव” आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः “आई मला खेळायला जाऊ दे”या बालगीतावरील सादरीकरण भावनिक व प्रभावी ठरले. पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या मंगळागौर व लोकनृत्यांमधून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची झलक पाहायला मिळाली. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले, तर सामाजिक संदेश देणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
कार्यक्रमाला भांबेड हायस्कूलचे शिक्षक ऋषिकेश बेर्डे, संजय काकडे, प्रकाश कांबळे, सौ. मानसी बेर्डे, सौ. सोनिया गांधी, शंकर गांधी, विवेक गांगण आदींसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ. मनिषा देसाई व उपशिक्षिका सौ. साधना पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दुर्वा गांगण, मुख्याध्यापिका सौ. मनीषा देसाई, उपशिक्षिका सौ. साधना पाटील, अंगणवाडी सेविका सौ. प्रतीक्षा गांधी, मदतनीस सौ. रिया साळवी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनायक खामकर, सौ. सान्वी खवळे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. मयुरी गांगण, राजेंद्र गांधी, रमेश लांजेकर, सौ. तेजस्वी खेतल व सर्व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.











