आपलं देवरूख.. सुंदर देवरूख ग्रुपच्यावतीने देवरूख शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात विशेष बैठक संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

‘आपलं देवरुख सुंदर देवरूख’ ग्रुपच्या वतीने देवरुख विकास आराखडा व शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात काल शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता श्री सद्गुरू लोकमान्य टिळक वाचनालय, देवरुख सभागृहात महत्त्वपूर्ण सभा उत्साहात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत होते. प्रास्ताविक श्री संभाजी आंब्रे यांनी करत सभेचा आणि आपलं देवरुख ग्रुपचा मुख्य उद्देश स्पष्ट केला व उपस्थित सदस्य आणि नागरिकांचे स्वागत केले. डॉ. सरदार पाटील यांनी प्रोजेक्टरच्या साहाय्याने संपूर्ण विकास आराखड्याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण करून त्यातील माहिती, गरज आणि महत्त्व समजावून सांगितले. आराखड्यातील विविध तांत्रिक बाबींवरही त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.

श्री युयूत्सू आर्ते यांनी नगरपंचायतीने नागरिकांना आराखड्याची पूर्वकल्पना आणि आरक्षण कळीत करण्याची गरज होती असे मत व्यक्त केले. तर अध्यक्ष श्री सदानंद भागवत सरांनी हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा आग्रह धरला. यावेळी श्री नितीन शेडगे, निखिल कोळवणकर, श्री मुन्ना शेठ, श्री बांडागळे गुरुजी तसेच ॲड. सरताज कापडी यांनी आरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. उपस्थित नागरिकांनी विकास आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी ठाम भूमिका व्यक्त केली. सभेला प्रा. धनंजय दळवी, प्रा. देशमुख सर, पंढरीनाथ मोहिरे, सुरेंद्र गिते, महेंद्र कांगणे आणि व्यापारी उपस्थित होते.

दरम्यान, सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता देवरुख नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना हरकतींसाठी मुदतवाढ देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्याआधी जास्तीत जास्त नागरिकांनी निवेदनावर सह्या कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. सह्यांसाठी पत्र क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री निखिल कोळवणकर यांच्या साईनाथ कोल्ड्रिंक्स दुकानात उपलब्ध ठेवण्यात येणार असून हरकतींचा नमुना आपलं देवरुख ग्रुपवरही उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी सोमवारपर्यंत आपल्या हरकती व सूचना तयार करून नगरपंचायतीत सादर कराव्यात, असेही सांगण्यात आले.

सभेच्या शेवटी डॉ. सरदार पाटील यांनी देवरुख शहराच्या सद्यस्थितीचा व भविष्यातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आढावा घेत विकास आराखडा समजावून सांगितला. भाऊ शिंदे यांनी सभेचा आढावा घेत डॉ. पाटील यांचे विशेष अभिनंदन केले व उपस्थितांचे आभार मानले. भविष्यात आपलं देवरुख सुंदर देवरुख या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच सभेसाठी तातडीने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री सद्गुरू लोकमान्य टिळक वाचनालय देवरुखचे अध्यक्ष मा. श्री जी. के. जोशी सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.