ग्रामीण भागात आरोग्यसेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय देवगडची यंदाच्या राज्यस्तरीय “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” व “महा आरोग्य सन्मान २०२६” या मानाच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत ग्रामीण स्तरावर दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सेवेची ही दखल मानली जात आहे.
दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी , मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यमंत्री व राज्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. प्रकाश पाटोदेकर, श्री. अविनाश कर्णाळू, श्री. साईकुमार सुतार, श्री. ज्ञानेश्वर मोकासवाड, श्री. श्रीपाद मोर्ये व श्री. राजकुमार मुंढे उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी बाह्यरुग्ण व अंतर्रुग्ण विभागातील सेवा, लहान व मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा तसेच सिझेरियन शस्त्रक्रिया आदी निकषांवर रुग्णालयाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला होता. ग्रामीण स्तरावर प्रभावी व सातत्यपूर्ण आरोग्यसेवा पुरवल्याबद्दल रुग्णालयाची निवड करण्यात आली.
या सन्मानामुळे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अधिक जोमाने सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. या यशामुळे राज्याच्या पातळीवर देवगडचे नाव उंचावले असून जिल्हास्तरीय अधिकारी व इतर विभागांकडून ग्रामीण रुग्णालय देवगडच्या कार्याचे कौतुक होत आहे.
या यशामागे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची दूरदृष्टी, नाविन्यपूर्ण संकल्पना व भक्कम पाठिंबा लाभला असून जिल्हाशल्यचिकित्सक श्रीपाद पाटील व इतर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत होते. ग्रामीण रुग्णालय देवगडला राज्यस्तरीय मंचावर मिळालेला हा पुरस्कार देवगडवासियांना समर्पित करण्यात आला आहे.












