रिंगणे येथे पार पडला महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळावा

लांजा (प्रतिनिधी) कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत रिंगणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत महिला मेळावा नुकताच रिंगणे येथे पार पडला.

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी एच.बी.गिरी , सरपंच संजय आयरे, ग्रामसेवक भागवत, कृषी विज्ञान केंद्र लांजा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आनंद हणमंते, मत्स्य विषय तज्ञ डॉ. वैभव येवले, कृषी विद्या शास्त्रज्ञ डॉ. महेश महाले, समुदाय आरोग्य अधिकारी दिपाली परचंडेकर, आरोग्य सहाय्यक जंगम, ग्रामपंचायत सदस्य आर्या आयरे, श्रावणी धुळप, कोकण एनजीओचे समन्वयक गौरव पाटकर, समीर शिर्के यांच्यासह सुमारे ७० ते ८० महिला उपस्थित होत्या.

उपस्थितांचे स्वागत गौरव पाटकर यांनी केले. यानंतर सरपंच संजय आयरे यांनी महिला सक्षमीकरण व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक ते सहकार्य सातत्याने केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच गटविकास अधिकारी गिरी साहेब यांनी कुटुंबाच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. या मेळाव्यात महिलांना शेतीविषयक मार्गदर्शन, शेतीपूरक व्यवसाय, बचत गटांसाठी व्यवसायाच्या संधी, तसेच आर्थिक उत्पन्न वाढवण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. महेश महाले यांनी नैसर्गिक शेती व शेतीतून उत्पन्न वाढवण्याच्या उपायांवर भर दिला. डॉ. वैभव येवले यांनी मत्स्य व्यवसायातून उत्पन्न कसे मिळवता येईल याची माहिती दिली, तर डॉ. आनंद हणमंते यांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व आरोग्य जपण्याचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमात महिलांसाठी फनी गेम्स घेण्यात आले. सर्व वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर शिर्के यांनी केले,