ब्राह्मण समाजातील महिलांबाबत अवमान करत पोस्ट
लांजा (प्रतिनिधी) ब्राह्मण समाजातील स्त्रियांबाबत फेसबुक आयडीवर अवमानकारक पोस्ट टाकून जातीय वाचक विधाने करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मार्मिक चे संपादक मुकेश मचकर यांचा लांजा तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाच्या वतीने शुक्रवारी २८ जुलै रोजी जाहीर निषेध करण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले.
तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेच्या मार्मिक चे संपादक मुकेश मचकर यांनी त्यांचे फेसबुक अकाउंट वर ब्राह्मण महिलांनापण मणिपूरला पाठवा आणि जाळायचे असल्यास पेट्रोल मी देतो अशी पोस्ट टाकली होती. सदर पोस्ट ही ब्राह्मण समाजातील महिलांना उद्देशून, जातीयवाचक विधाने करून समाजात तेढ उत्पन्न करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तसेच धार्मिक भावना भडकवण्याचे काम ते करत आहेत.
अशा प्रकारची जातीवाचक पोस्ट टाकण्याचा कोणालाही अधिकार नसताना नाहक समाजात तेढ उत्पन्न करून धार्मिक वातावरण गढूळ करण्याचे काम मुकेश मचकर हे करत आहेत .आम्ही समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत असून त्यांच्या विरोधात भारतीय दंड कलम २५३( अ), ५००, ५०५ (२) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
लांजा तहसीलदार प्रमोद कदम तसेच पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना निवेदन सादर करताना ब्राह्मण सहाय्यक संघ लांजाचे महेश सप्रे, ॲड राहुल देसाई, त्यागराज हर्डीकर ,सुनील शहाणे, प्रसाद कुलकर्णी, निशा कुलकर्णी ,सौ. शहाणे, डॉक्टर सौरभ पाध्ये ,आदित्य भिडे, श्री. सरदेसाई ,श्री. पाध्ये आदी उपस्थित होते.











