चिपळूण | प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवर चिपळूणचे नाव उज्ज्वल करणारी अभिमानास्पद घटना घडली असून, येथील युवा नृत्यूकार सुरज विलास जाधव यांची ‘डान्स स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया’ (DSAI) या राष्ट्रीय संघटनेच्या चेअरमनपदी सर्वानुमते निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी ही मोठी जबाबदारी स्वीकारणारे ते देशातील तरुण नेतृत्व ठरले आहेत.
१८ वर्षांचा संघर्ष आणि यश: एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुरज यांनी गेल्या १८-२० वर्षांपासून नृत्य क्षेत्रात मेहनत घेतली आहे. त्यांचे वडील रिक्षा चालक असूनही त्यांनी मुलाच्या प्रगतीसाठी नेहमीच साथ दिली. सुरज यांनी सावर्डे पॉलिटेक्निकमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे. ते चिपळूणमधील प्रसिद्ध ‘DAIDAS’ डान्स स्कूलचे संस्थापक आहेत.
सुरज जाधव यांची कामगिरी:
-
सलग ११ वेळा राष्ट्रीय आणि ३ वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते.
-
टीम इंडियाचे मॅनेजर आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्य.
-
महाराष्ट्र राज्यभूषण आणि सिंधूरत्न पुरस्कारांनी सन्मानित.
पुढील ध्येय: नॅशनल चेअरमन म्हणून सुरज आता देशभरात “नृत्य ही एक क्रीडा (Sport)” म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्या या यशात पत्नी सौ. दीपिका जाधव आणि आई-वडिलांचा मोलाचा वाटा असून, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













