न्हावेली l प्रतिनिधी :मळेवाड प्राथमिक शाळे जवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व दुचाकी यांच्यात भीषण धडक होत अपघात झाला. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चिन्मय रवींद्र पेडणेकर (वय २१) रा. होडावडे (सुभाषवाडी) संकेत अशोक घोगळे (वय- ३६) हे दोघे होडावडे वरून कामानिमित्त गोव्याच्या दिशेने जाताना आज सकाळी ७.०० च्या सुमारास मळेवाड प्राथमिक शाळा जवळील वळणावर मायनिंग वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी स्वार यांच्यात जोरदार धडक झाली. यात दोन्ही दुचाकी स्वार जखमी झाले असून केवळ दैवबलवत्तर म्हणून बालबाल बचावले. दोघांनाही मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून डॉ. विक्रम मस्के यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेची पोलीस स्टेशनला अद्याप तक्रार नसून दोन्हीही बाजूने सदर प्रकरण आपापसात तडजोड करून मिटवले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भरधाव व बेजबाबदार पणे डंपर चालक वाहने चालवत असल्याने मळेवाड ते सातार्डा या महामार्गावरून वाहने चालविणे धोक्याचे बनले आहे. आठवड्यापूर्वी याच महामार्गावरून साटेली येथे सोनुर्ली येथील युवकाला डंपर चालकाने धडक देऊन पलायन केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा हा अपघात घडल्याने प्रशासनाने व या भागातील लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकायदेशीर मायनिंग वाहतूक व बेजबाबदारपणे वाहतूक करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे.











