रत्नागिरीत रंगली अंतिम फेरी; ‘कर्ण’ द्वितीय तर ‘द हिंदू लेडी’ नाटकाने पटकावले तृतीय पारितोषिक
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला असून, डोंबिवलीच्या ‘श्रीकला संस्कार न्यास’ संस्थेच्या ‘दगडी भिंत’ या नाटकाने प्रथम क्रमांकाचे ६ लाख रुपयांचे भव्य पारितोषिक पटकावले आहे. रत्नागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत ही स्पर्धा अत्यंत जल्लोषात पार पडली.
स्पर्धेत बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ निर्मित ‘कर्ण’ या नाटकाला द्वितीय (रु. ४ लाख), तर मुंबईच्या नवहिंद बालमित्र मंडळ संचलित ‘द हिंदू लेडी’ या नाटकाला तृतीय पारितोषिक (रु. २ लाख) जाहीर झाले आहे.
वैयक्तिक कामगिरीचा गौरव
नाटकाच्या तांत्रिक आणि अभिनय बाजूनेही अनेक कलाकारांनी आपली मोहोर उमटवली आहे. ‘दगडी भिंत’ नाटकासाठी आशुतोष वाघमारे यांना दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच नेपथ्यासाठी वृशांक कवठेकर, प्रकाश योजनेसाठी विनोद राठोड, रंगभूषेसाठी उंल्लेश खंडारे आणि संगीत दिग्दर्शनासाठी ओमकार जाधव यांना आपापल्या विभागात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
अभिनयातील ‘रौप्यपदक’ विजेते
उत्कृष्ट अभिनयासाठी पुरुष गटात हर्षवर्धन कारंडे-देशमुख (मी कुमार), मिनार पाटील (अग्नीपंख), प्रा. दिपक आमोलकर (द लास्ट सेल) यांच्यासह वैभव देशमुख, प्रताप सोनावणे, सुमित घाग, संतोष पाटील, ओम चव्हाण, इरफान मुजावर आणि मनोज डाळीमकर यांना रौप्यपदक जाहीर झाले.
स्त्री कलाकार गटात श्रुती गणपुले (दगडी भिंत), कल्पिता राणे (कर्ण), निखिला इनामदार (दगडी भिंत) यांच्यासह रुपाली राऊत, शिवानी पेडणेकर, संपदा भोसले, प्रियांका जंगम, अश्विनी आंचलवले-कुलकर्णी, केतकी भालवणकर आणि भावना रहाटे यांनी उत्कृष्ट अभिनयाची रौप्यपदके पटकावली.
मान्यवरांकडून कौतुक
या अंतिम फेरीत एकूण ४६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. राजा अत्रे, संजय हळदीकर, मंगेश नेहरे, पद्मनाभ पाठक आणि श्रीमती प्रिया नेर्लेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सर्व विजेत्यांचे व सहभागी संस्थांचे अभिनंदन केले आहे. “भविष्यातही संस्था आणि कलाकारांनी अशाच प्रकारे दर्जेदार काम करून मराठी नाटकाची परंपरा समृद्ध करावी,” अशी अपेक्षा मंत्री शेलार यांनी व्यक्त केली.










