वेंगुर्ले पं. स. नूतन सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांचे केले अभिनंदन
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. महायुती म्हणून या तालुक्यातील विकासाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आहे. महायुतीच्या नवनिर्वाचित वेंगुर्ले तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांना शुभेच्छा देताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी तालुक्याच्या विकासाबाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असे सांगितले.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी महायुतीला शंभर टक्के बहुमत दिले. महायुती मधील विजयी उमेदवारांपैकी शंकर घारे यांना सभापती आणि सचिन देसाई यांना उपसभापतीपदी आज संधी दिली आहे. या दोघांना शुभेच्छा दिल्यानंतर श्री दळवी बोलत होते. अन्य सर्व सदस्यांनी निवड प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल दळवी यांनी सर्वांचे आभार मानले. यापुढे तालुक्यातील ग्रामस्थांच्या ज्या काही समस्या किंवा विकासात्मक कामे असतील ती जाणून घेण्यासाठी आमचे सर्व सदस्य गावात जातील समस्या जाणून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. माहिती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही दळवी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, गटनेते आपी फणसेकर, सदस्य संकेत धुरी, नितीन चव्हाण, तसेच कमलेश गावडे, वसंत तांडेल, राजबा सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













