लांजा (प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि समान संधी मिळाल्यास महिला समाजाच्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी समृद्धी खडपे यांनी पन्हळे येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जि. प. प्रा. आदर्श शाळा पन्हळे नं.१ येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी सौ. समृद्धी खडपे यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून मानपत्र, साडी-चोळी, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी गावातील काही कर्तृत्ववान मातांचाही विशेष सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. महिला बचत गटांच्या पदाधिकारी तसेच गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत तावडे, सदस्य शशिकांत मसणे उपस्थित होते. तसेच पन्हळे-आनंदगाव बचत गटाच्या ग्रामसखी सौ. समीक्षा मसणे, माजी सरपंच सौ. शीतल कुडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. विजया गोसावी, आशा सेविका दिपाली मसणे तसेच अनुसया गोसावी, सुरेखा पानगळे, विनिता मसणे, प्रतीक्षा मसणे, रोशनी कुडकर, कोमल मसणे, गीता मसणे, हेमांगी मसणे, वैदेही चौगुले, दिपाली गुरव, सुनीता भुवड, साक्षी मसणे, सुमित्रा चौगुले, ममता गुरव, रसिका तावडे, समीक्षा कुडकर तसेच शाळेच्या स्वयंपाकी उज्वला गुरव आदी महिला, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. खडपे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. तसेच “माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा” या स्पर्धेत शाळेला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळून जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. शाळा उत्तरोत्तर प्रगती करत राहो, यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अजित मांडवकर, पदवीधर शिक्षक दिलीप चव्हाण, शशिकांत कांबळे, स्वप्नगंधा डंबे, प्रफुल्ल जाधव यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप चव्हाण यांनी केले.











