धुक्यात हरवलय कोकण…!

वार्तापत्र-कोकण / संतोष वायंगणकर

यावर्षीच्या या वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ कोकणातील आंबा, काजू बागायतींवरच आहे असे नाही. तर कोकम, नारळ, सुपारी, जांभुळ या पिकांवरही होत आहे.रानात, डोंगर कपारीत तयार होणारी करवंदांचेही देखिल तसेच आहे. कोकणातील या ‘काळी मैना’ म्हणून ख्याती असलेली करवंदांची टेस्ट फारच निराळी हे सगळ सगळयात भारीच आहे. परंतु यावर्षी कोसळलेला पाऊस, मध्येच पडलेला दव आणि आता तर गेले चार-पाच दिवस कोकणात धुक पडतेय. या धुक्यात कोकण हरवलय… पहाटेच्यावेळी कोकणातील दाट धुक जरी विहंगम दृश्य निर्माण करत असल तरीही, धुक्यातल कोकण पहाताना मनोहारी दृश्य वाटत असल तरीही… कोकणातील सध्या पडलेल्या धुक्याने कोकणात आर्थिक संकट निर्माण केले आहे…

 

कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव, शिमगोत्सव म्हटल्यावर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरी, व्यवसायानिमित्ताने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये गेलेल्यांना या सणासुदीला गावात यावच लागत. गावाबाहेर शहरात थांबण त्यांना जमतच नाही. ते अस्वस्थ होतात. आणि या सणांच्या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शिमगोत्सव जोरदार साजरा करतात. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सव पारंपारिक परंतु वेगवेगळया पद्धतीने साजरा करतात. सर्वसाधारणपणे याच शिमगोत्सवात आंबा, काजू, फणस यांचा बहर आलेला असतो. आणखी काही दिवसांमध्येच आंबा, काजू, फणस तयार होतो. परंतु यावर्षी मात्र वातावरणातील सततच्या बदलाने आताच्या घडीला आंबा, काजू बागायतदाराच्या हाती दहा-वीस टक्केही पिक येणं मुश्किल झालेलं आहे. एकतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सतत पडणाऱ्या पावसामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत होताच. परंतु यातही काही चांगल घडेल अशी अपेक्षा करून होता. परंतु झाल उलटेच. एकतर पावसाळा लांबलेला त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी पावसाने पळूवन लावली. थंडी उशिराने सुरू झाली. सहाजिकच त्याचा परिणाम कोकणातील आंबा, काजू, कोकम आदी फळबागायतींवर झाला. बर यातच जी काही थंडी पडली त्यांने आंबा, काजू बागायती मोहोराने फुलून निघाल्या. आंबा, काजू बागायतीत आलेला मोहोर पाहून कोकणातील शेतकरी खूप खुष होता. मनोमन बागायतदार शेतकरी सुखावला होता. आंबा, काजूवरचा मोहोर पाहून यावर्षी बागायतीत दामदुप्पट पैसे मिळतील हे आडाखे बांधले जात होते. परंतु तसे घडले नाही. काही दिवसातच हा आलेला आंबा, काजूवरील मोहोर गळून पडायला सुरूवात झाली. आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी यावर किटकनाशक फवारणी, औषध फवारणी केली. परंतु मोहोर गळून पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. यातच मधल्याकाळात मध्यरात्री दव पडू लागला. गेल्या चार दिवसात कोकणात धुके पडू लागलेय. या सगळयामध्ये आंबा, काजू बागायतींमध्ये जे काही फळांच उत्पादन मिळेल ते उणे पुरे १०-१५ टक्के इतकेच असेल. म्हणजे आजतरी बागायतीतील ८५ टक्के नुकसान झालेलंच आहे. आंबा, काजू बागायतींमध्ये लाखो रूपयांचा खर्च करून हातात काहीच नाही अशीच काहीशी स्थिती आहे. आंबा बागायतदारांमध्येच चर्चा ऐकायला मिळते की घरातल्या कुटुंबियांना खाण्याएवढेही आंबे मिळणार नाहीत. कोकणातील बागायतदार शेतकरी खरंतर प्रचंड आर्थिक संकटात आहे. फक्त एकच फरक आहे कोकणातील शेतकरी आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी यांच्यामध्ये तो म्हणजे कोकणातील शेतकरी कधी रडत बसत नाही. कोकणातील शेतकरी, बागायतदार येणाऱ्या संकटाचा सामना करत ठामपणे उभा रहातो. एकतर अवाक्याबाहेर तो कर्ज काढत नाही. कर्ज भरण्याची जितकी एैपत असेल तेवढच कर्ज तो काढतो. यामुळे आजच्या क्षणापर्यंत कर्जबाजारीपणामुळे कोणी शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. यावर्षी नुकसान झाले तरी पुढच्यावर्षी निश्चितपणे झालेलं नुकसान भरून निघेल हा त्याला विश्वास वाटत रहातो. आणि पुढच्या वर्षीच्या उमेदिने जे असेल ते समाधानी मनाने स्विकारत बागायतीत, शेतात कष्ट करत रहातो. आपल्यावर कर्जाचा डोंगर उभा रहाणार नाही याची काळजी तो घेतो. आणि बागायतीत राबत रहातो. आजवर कधीही त्यांनी बागायतीची, झाडांची नासधूस केली, ट्रॅक्टर फिरवला असा आततायीपणा, अविवेकीपणाने कधीही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी गरीब असला तरीही त्याच्या अल्पसंतुष्टतेने तो समाधानी रहातो. यावर्षीच्या या वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ कोकणातील आंबा, काजू बागायतींवरच आहे असे नाही. तर कोकम, नारळ, सुपारी, जांभुळ या पिकांवरही होत आहे. कोकणात जांभुळ उद्योगही मोठा आहे. कोकणातील जांभळाला बाजारातील इतर भागातून येणाऱ्या जांभळांपेक्षा अधिक किंमत आहे. कोकणातील फळांमधील वैशिष्ट्यता इतर भागातील फळांपेक्षा अधिक चांगली टेस्ट आहे. आणि यातले गुणधर्म, इथल्या मातीमुळे त्याला असणारे महत्व अधिक आहे. एक साधे उदाहरण घ्या आंबा, काजू, जांभुळ तर आहेच. परंतु कोकणातील कलिंगडाची चवही फारच वेगळी आहे. यातही कोकणातील कलिंगड देखिल जरी सर्वत्र होत असली तरीही त्याची त्या-त्या भागातील कलिंगडाची एक वैशिष्ट्यता आहे. कोकणात पिकणार प्रत्येक फळ अगदी चिंचेचही उदाहरण घेता येऊ शकेल. चिंच तर मराठवाडासह विविध भागात चिंच होते. परंतु कोकणात होणारी चिंच निश्चितच वेगळी आहे. रानात, डोंगर कपारीत तयार होणारी करवंदांचेही देखिल तसेच आहे. कोकणातील या ‘काळी मैना’ म्हणून ख्याती असलेली करवंदांची टेस्ट फारच निराळी हे सगळ सगळयात भारीच आहे. परंतु यावर्षी कोसळलेला पाऊस, मध्येच पडलेला दव आणि आता तर गेले चार-पाच दिवस कोकणात धुक पडतेय. या धुक्यात कोकण हरवलय… पहाटेच्यावेळी कोकणातील दाट धुक जरी विहंगम दृश्य निर्माण करत असल तरीही, धुक्यातल कोकण पहाताना मनोहारी दृश्य वाटत असल तरीही… कोकणातील सध्या पडलेल्या धुक्याने कोकणात आर्थिक संकट निर्माण केले आहे.
सध्या महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कोकणात आंबा, काजू बागायतदारांची नुकसानीची चर्चा विधिमंडळातही होत आहे. राज्यसरकारने कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ, नारळ, सुपारी बागायतदार शेतकऱ्यांना यावेळी मोठ्याप्रमाणावर नुकसानभरपाई देण्यात यावी. कोकणातील शेतकरी सरकारकडे कधीच काही मागत नाही. यावेळी शासनाने उदारतेने द्यावे हिच अपेक्षा !