रत्नागिरी जिल्ह्यात खबरदारी घेण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन
रत्नागिरी: कोकणात सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, वाढत्या उष्णतेमुळे जंगलांमध्ये वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या वणव्यामुळे आंबा आणि काजूच्या बागा होरपळून निघून बागायतदारांचे मोठे नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व भारत मौसम विभागाने केले आहे. बागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने बागेत ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे साफ करावेत, जेणेकरून आगीचा प्रसार रोखता येईल. तसेच, नवीन लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांच्या साहाय्याने सावलीची व्यवस्था करावी.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ११ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सुरुवातीचे दोन दिवस तापमान उच्च पातळीवर स्थिर राहून १३ मार्चपासून त्यात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता सकाळी ७२ ते ७८ टक्के आणि दुपारी ६९ ते ७४ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज असून वाऱ्याचा वेग ताशी २.३ ते ५.१ किलोमीटर इतका राहील.
या कोरड्या हवामानाचा विचार करून आंबा बागायतदारांनी फळधारणा झालेल्या झाडांना १५ दिवसांच्या अंतराने प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. आंबा फळांना फळमाशीपासून वाचवण्यासाठी बागेत प्रति एकर २ या प्रमाणात रक्षक सापळे लावावेत आणि वाटाणा ते गोटी आकाराच्या फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालावे. काजू बीची वेचणी करून ती तीन दिवस उन्हात चांगली वाळवून साठवणूक करावी. भाजीपाला पिकांमध्ये वांगी, टोमॅटो आणि मिरचीला गरजेनुसार ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे, तसेच कलिंगडाची फळे उन्हापासून वाचवण्यासाठी पेंढ्याने झाकून ठेवावीत. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जनावरांना दुपारच्या वेळी चरण्यास बाहेर सोडू नये आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यात १% गूळ व ०.५% मीठ मिसळून द्यावे, असे सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.













