आईच्या उपचारासाठी कुटुंब मुंबईला, मागे चोरट्यांनी घर साफ केले!

रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील पाली-माईनवाडी येथील घर फोडून अज्ञाताने 54 हजारांची रोख रक्कम लांबवली. घरफोडीची ही घटना 2 मार्च रोजी रात्री 11 ते 8 मार्च 2026 या कालावधीत घडली आहे.

याबाबत दुर्गेश रामदास पाटील (25, रा. पाली-माईनवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आपल्या आईला उपचारांसाठी मुंबई येथील रुग्णालयात घेउन गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटे उचकटून त्यातील रोख रक्कम आणि कॉईन असे एकूण 53 हजार 750 रुपये चोरुन नेले. दरम्यान, फिर्यादी घरी परतले असता त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.