करवीर तालुक्यात अफूची लागवड केल्या प्रकरणी एकास अटक…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

करवीर : तालुक्यातील बाचणी गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली आहे. शेतात अफूची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या का शेतकऱ्याला करवीर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सर्जेराव गणपती साळुंखे असे अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील बाचणी गावातील सर्जेराव साळुंखे याची बाचणी ते हिरवडे खालसा येथे रसत्यालगत शेतजमीन असून या शेतात त्याने अफूच्या झाडाची विक्री सुरू केल्याची गुप्त माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या शेतावर छापा टाकला असता अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्जेराव साळुंखे याला ताब्यात घेतले.

साळोखे याला न्यायालयात हजर केले असता नायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत पोलिसांनी ३९ किलो ३५० ग्रॅम वजनाची अफूची ओली रोप, पान, फुलं आणि बोंड असा सुमारे १ लाख १८ हजार पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अधिक तपास करत आहेत.