नवी मुंबई:
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची २३ वी बैठक नुकतीच नवी मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी गाड्यांचा कोटा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. मे २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, पाच मार्च रोजीच पीआरएस (PRS) टर्मिनलवर त्याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
गाड्यांच्या कोट्यात भरघोस वाढ
समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी रत्नागिरी स्टेशनसाठी सातत्याने पाठपुरावा केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. मडगाव येथील कोटा आता रत्नागिरीकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे:
कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस: २-एसी, ३-एसी आणि ३-ई क्लासमध्ये ५०% वाढ, तर स्लीपर कोट्यात २५% वाढ करण्यात आली आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस: चेअर कार आणि सेकंड सिटींग या दोन्ही क्लासमध्ये वाढ.
वंदे भारत एक्सप्रेस: चेअर कारच्या कोट्यातही वाढ करण्यात आली आहे.
याचा थेट फायदा रत्नागिरीसह संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येथील प्रवाशांना होणार आहे.
गेल्या काही काळापासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून प्रीमियम समजली जाणारी ‘तेजस एक्सप्रेस’ देखील तासनतास उशिराने धावत आहे. यावर वहाळकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रेल्वे प्रशासनाने मान्य केले की, मार्गावरील मेंटेनन्सची कामे, वाढलेली गाड्यांची संख्या आणि मध्य रेल्वेचे ब्लॉक यामुळे हा विलंब होत आहे. मात्र, येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होईल, असे आश्वासन सीएमडी संतोषकुमार झा यांनी दिले.
रत्नागिरी-दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याबाबत मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत ही गाडी दिव्यावरून लवकर सोडण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून रत्नागिरीत प्रवाशांना रात्री उशिरा पोहोचण्याची अडचण येणार नाही. यावर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील आठ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
पार्किंग सुविधा: रत्नागिरी स्टेशनवरील दुचाकी पार्किंगवर शेड उभारणे, पट्टे ओढणे आणि फलक लावण्याचे निर्देश मुख्य अभियंता प्रकाश साहेब यांना देण्यात आले आहेत.
खेड स्टेशनला थांबा: वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला खेड येथे थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैभववाडी-कोल्हापूर मार्ग: हा मार्ग भारतीय रेल्वे बांधणार असली तरी, कोकण रेल्वे हे काम करण्यास इच्छुक असल्याचे सीएमडींनी स्पष्ट केले.
या बैठकीला कोकण रेल्वेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर, वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी आमदार संजय केळकर आणि संसदेचे प्रतिनिधी खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते. सचिन वहाळकर यांनी मांडलेल्या विविध मागण्यांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.












