एका कामगाराला किरकोळ दुखापत
खेड (राकेश कोळी) : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील थर्स ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्यात आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास रसायनाच्या ड्रममध्ये स्फोट होण्याची घटना घडली. या घटनेत एका कामगाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात नवीन उत्पादनाची प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. यासाठी एका ड्रममध्ये विविध रसायनांचे मिश्रण करून त्याची चाचणी घेतली जात होती. या प्रक्रिये दरम्यान अचानक तापमान वाढल्याने रसायनाने पेट घेतला आणि त्यातून हलकासा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात घुमल्याने काही काळ कामगारांमध्ये घबराट पसरली.
घटनेच्या वेळी कारखान्यात पहिल्या पाळीतील तसेच सर्वसाधारण पाळीतील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी असे मिळून सुमारे २८ जण उपस्थित होते. स्फोटाची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी श्री. नलावडे हे इतर जवानांसह आगीचा बंब घेऊन कारखान्यात दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच कारखाना व्यवस्थापनाने प्रसंगावधान राखत रसायनाची आग विझवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.
दरम्यान स्फोटानंतर झालेल्या धावपळीत एका कामगाराचा पाय मुरगळल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ त्याला उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात हलविले.
लोटे औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे येथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज झालेल्या स्फोटाचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.












