जि. प. पू. प्राथ. विद्यामंदिर गुजराळी येथे कै. वसंत आठल्ये स्मृती पुरस्काराचे वितरण

राजापूर (वार्ताहर): शहरातील जि. प. पू. प्राथमिक विद्यामंदिर गुजराळी शाळेचे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील स्नेहसंम्मेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच श्री मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी बालकलाकारांनी आपल्या बालसुलभ कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कै. वसंत आठल्ये स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्या आले. यावेळी मान्यवरांचे हस्ते वर्षभरात विविध क्रीडा तसेच स्पर्धा परिक्षांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तु व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच यावेळी श्रीम. वृषाली वसंत आठल्ये पुरस्कृत कै. वसंत आठल्ये यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा ‘वसंत आठल्ये स्मृती पुरस्कार इ. ४ थी तील कु. मधुरा राजेंद्र सावंत व इ. ७ वी तील गौरव जगदीश पांचाळ या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. दरवर्षी इ. ४ थी व ७ वी उत्तीर्ण झालेल्या हुशार, गरीब व होतकरू अशा दोन मुलांना मदत व प्रोत्साहन म्हणून प्रत्यकी रोख एक हजार रूपये पुरस्कार रुपात दिले जातात.
त्यानंतर इ. १ली ते ७ वीतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलांनी विविध नृत्य, नाटक, एकांकिका सादर करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी केंद्रप्रमुख अनिल जायदे, नगरसेवक सुबोध पवार, दिलीप चव्हाण, नगरसेविका प्रेरणा नार्वेकर, सौ. जान्हवी वादक, साजिया काझी, माजी नगरसेविका मनिषा मराठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक सावंत, उपाध्यक्षा अनन्या करंबेळकर, शिक्षणतज्ञ प्रकाश ढवळे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर, विशाल करंबेळकर, मनोज पवार, माजी शिक्षक श्री. बापट गुरुजी, श्री. अमरे गुरुजी व सौ. बाईत बाई उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.