दापोली | प्रतिनिधी :
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दिनांक ७ फेब्रुवारी रोजी शांततेत पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी उद्या, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात सुरू होणार आहे.
सुरुवातीला चार टेबलांवर तीन फेऱ्यांमध्ये टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमद्वारे मतमोजणीसाठी एकूण १४ टेबलांवर १४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दापोली तालुक्यातील एकूण १ लाख ४० हजार ५५८ मतदारांपैकी ७५ हजार ७१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३५ हजार ६४५ पुरुष व ४० हजार ०७२ महिला मतदारांचा समावेश असून, तालुक्यात ५३.८६ टक्के मतदान झाले आहे.
मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दोन पोलीस निरीक्षक, सहा अधिकारी, १६० पोलीस अंमलदार व ३६ होमगार्ड असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतमोजणी व निकालानंतर नागरिकांनी संयम राखावा तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य पुढेही करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी तहसीलदार अर्चना बोंबे, नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे व पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर उपस्थित होते.












