चिपळूणमधील पवन तलाव मैदानाचे रूपडे पालटणार

विकासासाठी १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर; खेळाडूंसह क्रीडाप्रेमींना दिलासा
आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

संतोष सावर्डेकर/चिपळूण:
चिपळूणमधील ऐतिहासिक पवन तलाव मैदान हे प्रमुख क्रीडा मैदान असून या मैदानात गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट स्पर्धा पार पडत आल्या आहेत. या मैदानात क्रिकेटपटूनी आपला खेळ सादर करीत क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. मात्र, या मैदानाची दुरावस्था पाहता या मैदानाचे रुपडे पालटण्यासाठी आ. शेखर निकम यांनी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला तर आता १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे या मैदानाचे रुपडे पालटणार असून क्रीडापट्टू व क्रीडा रसिकांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

शहरातील खेळाडूसाठी आधार ठरलेले पवन तलाव मैदान आता कात टाकत आहे. तत्पूर्वी या मैदानात उन्हाळी हंगामात पवन तलाव मैदान क्रीडा स्पर्धानी गजबजलेले असते. क्रिकेटपटू तर आपला उत्कृष्ट खेळ सादर करून क्रीडा रसिकांची मने जिंकतात. माजी खासदार तथा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखमोलाच्या क्रिकेट स्पर्धानी तर पवन तलाव मैदान गाजलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे. तर काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भव्य जाहीर सभेने राजकीय वर्तुळात ही सभालक्षवेधी ठरली होती. मात्र, दुसरीकडे या मैदानात अपुऱ्या सुविधा जाणवत होत्या. याबाबत क्रिकेटपटू व क्रीडा रसिक नाराजी व्यक्त करीत होते.

याची दखल घेऊन आ. शेखर निकम मैदानाच्या सोयी -सुविधांसाठी पुढाकार घेतला. यामध्ये पहिल्या टप्प्यात २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून या निधीतून कंपाउंड वॉल, प्रवेशद्वार, गटार बांधकाम, स्वच्छतागृह, टर्फ विकेट, गॅलरी शेड आदी कामे करण्यात आली.

तर आता या मैदानाच्या विकासासाठी १ कोटी १४ लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पडीक इमारतीचे सुशोभीकरण केले जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स व इनडोअर गेम इमारत सुसज्ज करण्यात येणार आहे. एकंदरीत पवन तलाव मैदानाचे रुपडे पालटणार आहे. आमदार शेखर निकम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीतून मैदानातील विविध कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.

पवन तलाव मैदान सुसज्ज होणार असल्याने चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यातून स्थानिक क्रीडासंस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पवन तलाव मैदान आता सुसज्ज होणार असल्याने क्रीडापट्टूना आपला खेळ दाखविण्याची चांगली संधी मिळणार आहे. महायुती सरकारने मैदानाच्या प्रलंबित विकासकामांसाठी सुमारे साडेतीन कोटींचा निधी मंजूर केल्याने मैदान आता कात टाकणार आहे. याबद्दल आ. शेखर निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे आभार मानले आहेत. आता पुढील काळात या मैदानाच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा आमदार निकम यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. तसेच क्रीडा स्पर्धांना देखील आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील दिली आहे.