समृद्ध वैभववाडी उभारणीसाठी सर्वांनी पुढे यावे – सभापती सिद्धेश रावराणे
भुईबावडा l प्रतिनिधी :भुईबावडा ग्रामपंचायतीने राबवलेले विविध उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असून इतर ग्रामपंचायतींनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध गाव स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.
भुईबावडा ग्रामपंचायतीने सोलर प्रकल्प, प्लास्टिक मुक्त गाव, सहकार सेवा केंद्र यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले असून हे उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच “दुर्गम” अशी ओळख असलेल्या वैभववाडी तालुक्यावरील ठपका दूर करून समृद्ध वैभववाडी घडवूया, असेही ते म्हणाले.
यावेळी पंचायत समितीच्या वतीने भुईबावडा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देण्यात आली. उपसभापती सौ. कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे व सुवर्णा संसारे यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीने भविष्यातही अशीच विधायक कामे सुरू ठेवावीत, आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच बाजीराव मोरे यांच्या हस्ते सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपसरपंच स्वप्नाली देसाई, ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर, सदस्य वैशाली शिंदे, मोहिनी कांबळे, कल्याणी देसाई, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विलास मोरे, तानाजी मोरे, श्रीधर मोरे, दिनेश मोरे तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बाजीराव मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्निल कदम यांनी केले.











