▪️कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
▪️शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे धडे मिळणार
मसुरे | झुंजार पेडणेकर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) अभियानाला गती देण्यासाठी कृषी विभाग मार्फत माहे एप्रिल २०२६ मध्ये विशेष ‘डिजिटल शेतीशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे डिजिटल माध्यमाद्वारे दिले जाणार आहेत.नियोजनाचे चार टप्पे – ही डिजिटल शेतीशाळा चार भागात विभागली असून, प्रत्येक सत्राचे आयोजन सायंकाळी ७:३० वाजता करण्यात आले आहे:
१ एप्रिल: पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे, टोकण पद्धत, आंतरपीक आणि बीजप्रक्रिया.
८ एप्रिल: निविष्ठा उत्पादन – बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादींचे उत्पादन.
१५ एप्रिल: एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) – सापळा पिके आणि मित्र कीटकांचा वापर.
२२ एप्रिल: भात शेती तंत्रज्ञान – थेट पेरणी (DSR) आणि यांत्रिकीकरण पद्धत.
गावपातळीवर जय्यत तयारी –
या उपक्रमासाठी प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासह कृषीताई व कृषीसखी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एकत्र पाहण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा किंवा मंदिरे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रोजेक्टर, लॅपटॉप किंवा संगणकाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, स्थानिक कृषी सेवा केंद्रांनाही या शेतीशाळेचे प्रसारण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
डिजिटल सहभाग आणि शंका निरसन – शेतकरी या शेतीशाळेला Zoom लिंक किंवा YouTube Live द्वारे जोडू शकतील. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या तांत्रिक शंकांचे निरसन प्रत्यक्ष उपस्थित असलेले अधिकारी करतील, तर ऑनलाइन सहभागी शेतकरी चॅट बॉक्स किंवा कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रश्न विचारू शकतील.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या डिजिटल शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे ‘नोडल अधिकारी’ उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील यांनी केले आहे.













