सावंतवाडी : येथील बीरोडकर टेंब – द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून डक्टच्या मोकळ्या जागेतून खाली पडल्याने २० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुबी खातून मुन्ना खान (वय २०, रा. पूर्व चंपारण्य, बिहार) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुबी खातून ही आपल्या पतीसह द्वारका नगरी परिसरातील संबंधित इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर राहत होती. शुक्रवारी, ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रूममधील लाईट गेली. त्यामुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेली ट्यूबलाईट काढून खाली आणून बसवण्यासाठी रुबी तिचे पती आशू साबीर हुसेन आणि शेजारी हसन सय्यद यांच्यासोबत वरच्या मजल्यावर गेली होती.
चौथ्या मजल्यावर हसन हा ट्यूबलाईटची वायर तोडून काढत असताना पती आशू हा त्याला मोबाईल टॉर्चचा उजेड दाखवत होता. यावेळी रुबी ही बाजूला उभी असताना अंधारात तिचा अंदाज चुकला आणि ती चौथ्या मजल्यावरील डक्टच्या मोकळ्या जागेतून थेट खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने मोटारसायकलवरून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री ९ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे, पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार महेश जाधव, संजय कोरगावकर आणि प्रवीण वालावलकर यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. मृत महिलेचे माहेरचे नातेवाईक बिहार येथून आल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या घटनेचा अधिक तपास करत आहेत.













