भीषण आगीत पाच दुकाने खाक, व्यापाऱ्यांचे ७० लाखांचे नुकसान
दापोली (विशेष प्रतिनिधी) :– दापोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत ४ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने मोठा कहर घडवून आणला. काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केलेल्या या आगीत पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून दिलीप भैरमकर, परेश जैन, मालाराम चौधरी, अपी मोरे आणि संदीप राजपुरे या व्यापाऱ्यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
आग लागल्यानंतर बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांना लागून असलेली दुकाने, ज्वलनशील साहित्य आणि अरुंद रस्ते यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला. परिस्थिती गंभीर होत असतानाच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. शहरातील युवकांनी धाडसाने पुढाकार घेत पाण्याच्या बादल्या, मोटारी व उपलब्ध साधनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या एकजुटीमुळे आग वेळेत आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर दापोलीतील अग्निशमन सुविधांच्या अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र, या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे दापोली नगरपंचायतीसाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या नवीन अग्निशमन वाहनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्र अग्निशमन संचालनालय, मुंबई स्तरावर या वाहनाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असून लवकरच हे वाहन दापोलीकराच्या सेवेत दाखल होणार आहे.
या निर्णयाचे दापोलीच्या नगराध्यक्ष सौ. कृपा शशांक घाग यांनी स्वागत केले आहे. “शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही सुविधा अत्यंत आवश्यक होती. ९० लाख रुपयांच्या या अग्निशमन वाहनामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी मदत पोहोचवणे शक्य होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
योगेश कदम यांच्या या पुढाकारामुळे दापोली शहर व परिसरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून भविष्यात अशा घटनांवर अधिक वेगाने आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
दरम्यान, दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र राजपुरे यांनी नागरिकांचे आभार मानत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. “दापोलीकरांनी दाखवलेली एकजूट ही प्रेरणादायी आहे. आता सर्वांनी पुढाकार घेऊन या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करावी,” असे त्यांनी नमूद केले.
एकूणच, या भीषण आगीत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली. त्याचबरोबर योगेश कदम यांच्या पुढाकारातून आणि ९० लाख रुपयांच्या तरतुदीमुळे दापोलीची अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.











