२००२ च्या मतदार यादीत नावाचे बंधन ‘राष्ट्रवादी’चे तहसीलदारांना निवेदन

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात २००२ च्या मतदार यादीत नाव असण्याच्या अटींबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष नितीन (आबू) ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनामार्फत बी.एल.ओ. (Booth Level Officer) नियुक्त करून मतदारांची सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष काम करताना अनेक तांत्रिक व कागदपत्रांशी संबंधित अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः २००२ पूर्वी परदेशात असलेल्या व्यक्तीने नंतर भारतात येऊन नाव नोंदवले असल्यास त्याच्या बाबतीत २००२ च्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे का, याबाबत संभ्रम आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीचे लग्न होऊन ती दुसऱ्या गावात स्थायिक झाल्यानंतर तिच्या नावाच्या नोंदीबाबतही अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, एका जिल्ह्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या मुलीचे लग्न दुसऱ्या जिल्ह्यात झाल्यास त्या मुलीचे नाव संबंधित तालुक्यातील मतदार यादीत नोंदवताना २००२ च्या मतदार यादीतील वडिलांचे नाव पुरावा म्हणून ग्राह्य धरावे का, याबाबत स्पष्टता नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, बी.एल.ओ.चे काम सध्या शिक्षकांवर सोपवण्यात आले असून त्यांना स्थानिक पातळीवरील सर्व माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत देण्यात यावी, अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शौकतभाई मुकादम, दादा साळवी, जयंद्रथ खताते, रमेश राणे, मिलिंद कापडी, आदिती देशपांडे, रविना गुजर, विकास गमरे, वसंत झिमण, प्रकाश पवार, विलास महाडिक, शिवाजी गोटल आदींच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.