कर्ज योजनांचे लाभ घेण्याचे केले आवाहन
चिपळुनात झाली बैठक
चिपळूण (प्रतिनिधी): ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेप्रमाणे ‘चर्मोद्योग विकास महामंडळ आपल्या दारी’ ही मोहीम व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार असल्याची ग्वाही चर्मोद्योग विकास महामंडळ रत्नागिरी व्यवस्थापक नागनाथ पवार यांनी दिली.
रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभाग (ता. खेड) विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकाराने दैनिक प्रहार चिपळूण कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांच्यासह उपस्थितांनी नागनाथ पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी, या संकल्पनेप्रमाणे ‘चर्मोद्योग विकास महामंडळ आपल्या दारी’ मोहीम राबवून रोहिदास समाजबांधव-भगिनींना महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यातून छोटे-छोटे व्यवसायिक व उद्योजक घडावेत, असा आपला मानस आहे. यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. तसेच महामंडळाच्या बँकेमार्फत व थेट कर्ज योजनांची माहिती दिली. या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
तर यावेळी दीपक चिपळूणकर यांच्यासह गणेश शंकर कदम, प्रकाश कदम आदींनी महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत ५० हजारांच्यावरील कर्जासाठी कर्जदार व जामीनदारांच्या मालमत्तांवर कर्जाचा बोजा ही अट किचकट असून या प्रक्रियेमुळे कर्जदार व जामीनदारदेखील पुढे येणार नाहीत, तरी ही अट शिथिल करावी अशी मागणी केली. या मुद्द्यावर उपस्थितीतांनी सहमती दर्शवली.
तर सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांनी या अटीसह अन्य मुद्द्यांवर महामंडळ व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजातर्फे निवेदन दिले पाहिजे, असा मुद्दा उपस्थित केला. यावर सर्वांनी सकारात्मकता दर्शवली.
एकंदरीत महामंडळाच्या कर्ज योजना उपस्थित सर्वांनी समजावून घेतली. तर महामंडळाने कर्जाबाबत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी चर्मोद्योग विकास महामंडळाच्या सुप्रिया पवार, रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभाग उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, संघटक रूपेश मासवकर, खजिनदार गणेश कदम, सोनू पेवेकर तसेच समाज बांधव मयूर कदम, प्रशांत साखरपेकर, शुभम केळशीकर, प्रशांत चिपळूणकर, संतोष जानवलकर, दर्शना मोरे, दिपाली कदम आदी उपस्थित होते












