सावंतवाडी l प्रतिनिधी : सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा कै. अॅड. दीपक दाताराम नेवगी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलाकार दादा राणे-कोनसकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष अॅड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा शनिवार, १८ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कोनशी परिसरातील दादा राणे-कोनसकर यांनी गेली ३५ वर्षे दशावतार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. पारंपरिक दशावताराचा वारसा जपत त्यांनी नव्या प्रयोगांची जोड देत रसिकांना आकर्षित केले आहे. त्यांच्या सादरीकरणामुळे दशावतार कलेला वेगळी ओळख मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी २५० पेक्षा अधिक कथानक सादर केली असून, या क्षेत्रात ते लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आहेत.
दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीचे नगराध्यक्ष श्रीराजे भोसले असणार असून, ज्येष्ठ अभिनेते नंदू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.










