2008 चा गणशोत्सव सुरू होता आणि ज्येष्ठ संगीतकार नितीन शंकर यांचा मुंबईतून कॉल आला आशा भोसले दोन दिवसासाठी रत्नागिरीत येत आहेत. गेले अनेक दिवस आम्ही या कॉलची वाट बघत होतो तो अखेर आला होता. पाठोपाठ आर डी बर्मन यांचा ठेका अशी ज्यांची ओळख होती असे रत्नागिरीचे प्रतिभावंत कलावंत मारुतीराव कीर यांचे चिरंजीव मुन्नशेठ कीर यांचा कॉल आला आशाजींच रत्नागिरीत येणे निश्चित झालं तू दुसर कोणत काम ठेवू नकोस. तुला मला आशाजी बरोबर जायचं आहे. ज्यांच्या गाण्याचे अवघ्या विश्वातील संगीतप्रेमीना वेड लावल अशा स्वरसम्राज्ञी ला भेटायला मिळणार या जाणिवेने सुखवायला झालं होत. ठरलेल्या दिवशी आशाजी मुंबईतून निघाल्याचा निरोप आला.. त्यांचा मुक्काम होता अर्थातच रत्नागिरीच्या निवळी येथील निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईत लपलेल्या संगीतकार नितीन शंकर यांच्या निवळीच्या धबधब्याजवळच्या बंगल्यात. आधी ठरल्या प्रमाणे आशाजी भोसले, नितीन शंकर, मुन्नाशेठ कीर आणि मी अशी दुसऱ्या दिवशी बाहेर पडणाऱ्या मंडळींची नाव निश्चित झाली होती. पण यातील दोन मंडळींची सकाळ लवकर होणारी नव्हती त्यामुळे भल्या सकाळी आशाजींना भेटण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि हीच जबाबदारी मला कोणालाही हेवा वाटावा अशी आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय सकाळ देऊन गेली.
पहाटे अगदी सकाळी मी निवळीच्या नितीन शंकर यांच्या बंगल्यात पोहोचलो आणि साक्षात आशा भोसले बंगल्याच्या उंबरठ्यावर बसल्या होत्या.. बऱ्या पैकी धुकं – पावसाळी वातावरण होतं आणि यात समोर बसलेल्या आशाताई हे चित्र जसच्या तसं आजही माझ्या डोळ्या समोर आहे.. मी गाडीतून उतरताच समोरून आवाज आला “ये सचिन एकदम दिलेल्या वेळेच्या आधीच आलास”. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून त्याच म्हणाल्या” अ रे मला न्यायला तू येणार हे मला नितीन बोलला होता त्यामुळे तू आलास म्हणजे तूच सचिन असणार” अस म्हणून त्या हसल्या.आम्ही बंगल्याच्या आत आलो. ज्यांचे स्वर ऐकायला करोडो लोक वेडे असतात त्यांच्या तोंडून मारली गेलेली आपल्या नावाची हाक या धक्यातून सावरण्या आधीच मला त्यांनी दुसरा धक्का दिला..”तू चहा नाश्ता करणार ना मी तुझ्यासाठीच थांबले होते चल किचन मध्येच बसून चहा घेऊ”. आत किचन मध्ये कोणीच नव्हते किचन ओट्या समोरील डायनिंग टेबल ची खुर्ची मागे ओढत मला बसायला देत आशाजी किचन ओट्याकडे गेल्या. मी चहा नाश्ता करून आलोय तुम्ही घ्या असा सांगताच”अ रे आईच्या हाताचा रोज खात असशील एकदा आशा भोसलेंच्या हाताचा खाऊन बघ आठवण काढशील”. असा म्हणत आशाजी कामाला लागल्या…आणि पुढील काही सेकंदातच आशाजींच्या गाण्याचे स्वर कानावर पडले…पुढील पंधरा मिनिट माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारी होती. आशाजी कांदेपोहे करत होत्या..आणि गाणी म्हणत होत्या. मी भारावल्या सारखे ते क्षण फक्त अनुभवत होतो. ज्यांना लाइव्ह ऐकण्यासाठी जगभरातून लोक येतात.. हजारो लाखो रुपये मोजतात. त्या आशा भोसले माझ्या पासून अवघ्या पाच फुटावर गाणी म्हणत आहेत आणि प्रेक्षक मी एकटाच आहे. ही पंधरा मिनिट आयुष्यातील अविस्मरणीय होती. आशाजी कांदेपोह्याच्या दोन प्लेट घेऊन टेबल वर येऊन बसल्या.”खर सांगू तुला… आईच्या हातचे ते आईच्या हातचेच पण कधीतरी आठवण काढशील की आशाने कधीतरी कांदेपोहे करून खायला घातले होते”. पुढचा अर्धा तास आम्ही खूप छान गप्पा मारल्या. त्यांच्या पेक्षा सगळ्याच बाबतीत खूपच लहान असलेल्या माझ्याकडे माझ्या वैयक्तिक चौकशी बरोबरच त्यांच्या यापूर्वीच्या कोकण भेटीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. पुढील काही वेळातच मग संगीतकार नितीन शंकर, मुन्नशेठ कीर, पिंट्या साळवी, सकाळी दाखल झालेले त्यांचे फोटोग्राफर यांच्या बरोबर आम्ही सिंधुदुर्ग च्या दिशेने रवाना झालो. आशाताईंना कोकणातील बॅकवॉटर ची सफर घडवणार होतो. सिंधुदुर्गच्या बॅकवॉटर मध्ये एक सहा एकरचे बेट होत याच बेटाची सफर घडवायला आम्ही सिंधुदुर्गात पोहोचलो. तिथे आमचे मित्र राजन नाईक,विशाल देसाई तयार होतेच. किनाऱ्यावर लागलेल्या एका छोटेखानी बोटीत बसून आम्ही त्या बेटावर पोहोचलो. दुपारच्या जेवणाचे नियोजन राजन नाईक यांच्या घरी केले होतो. त्यांच्या घरी असलेल्या गणेशोत्सवात आशाजी घरातीलच एखादी व्यक्ती असावी अश्या सहभागी झाल्या. ही माणसं आपल्या कर्तृत्वाबरोबरच आपल्या वागण्याने इतकी मोठी कशी होतात हे त्यादिवशी आशाताई बरोबर वावरताना अनुभवायला मिळालं. घरातील छोट्या बरोबर लहान होऊन वावरणार त्यांचे व्यक्तिमत्व मनात घर करून गेल.कोकण चे आणि नाईकांकडच्या जेवणाचे आशाजी सतत खूप कौतुक करत होत्या.आशाजींचा हा दौरा दोन दिवसांचा होता पण कुडाळ मध्ये असताना अचानक आलेल्या एक फोन कॉल ने तो आवरता घ्यावा लागला. कुडाळच्या राजन नाईक यांच्या गाडीनेच आम्ही गोव्याच्या विमानतळाच्या दिशेने रवाना झालो. विमानतळावरून निघताना”तुम्हाला दिवसभर खूप त्रास दिला रे तुमची धावाधाव केली” असा म्हणत आशाजी नी निरोप घेतला. आज अचानक आलेल्या त्यांच्या आजारपणाच्या आणि पाठोपाठ दुखद निधनाच्या बातमीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वीसहून अधिक भाषांमध्ये बाराहजारहून अधिक गाण्यांनी करोडो रसिकांना मंत्रमुग्ध करत एक अमर नजराणा देऊन गेलेल्या आशाजी ची ही रत्नागिरी भेट माझ्यासाठी अमूल्य आणि कायम स्मरणात रहाणारी होती.
सचिन देसाई,रत्नागिरी.













