दलवाई हायस्कूलची जलाशय स्वच्छता मोहीम

चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दलवाई हायस्कूल मिरजोळीमध्ये गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत विविध स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते, त्यातील एक भाग म्हणून सोमवार दिनांक १३ एप्रिल रोजी मिरजोळी खोरी येथील जलाशय स्वच्छ केला.
तेथे वाढलेली झूडपे, गवत, पालापाचोळा दूर केला.अडकलेले प्लास्टिक यांचे संकलन केले. पाणी अडवण्यासाठी केलेल्या बंधाऱ्याची डागडुजी केली. तसेच येथे असलेल्या दशक्रियाविधी घाटावरील पालापाचोळा उचलून तेथील स्वच्छता केली. नदी, पाणी याचे महत्व सांगणाऱ्या घोषणानी परिसर दुमदूमला. मिरजोळी परिसरातील सर्वजनिक विहिरीच्या भोवताली साठलेला पालापाचोळा स्वच्छ केला. साठलेल्या पाण्याला जाण्यासाठी मार्ग करून दिला. विद्यार्थ्यानी केलेल्या या उपक्रमाबाबत सौ. रिया सुर्वे यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. येथे जमलेल्या ग्रामस्थांनी कौतुक केले. यानंतर परतीच्या मार्गावर येत असताना प्रशालेचे मुख्याध्यापक. रोहित जाधव, शिक्षिका सौ. संध्या बोराटे यांनी घोषणा देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत ई वेस्ट, प्लास्टिक चे धोके या बाबत जागृती केली व प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले व कापडी पिशव्यांचे वितरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सफाई केली. याप्रसंगी मिरजोळी गावचे सरपंच विनोद पवार यांनी प्रशालेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संतोष तांबे, मिलिंद जाधव, सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.