चालक गंभीर जखमी : खड्डे ठरताहेत ‘काळ’
सावंतवाडी | प्रतिनिधी:
येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळाच्या समोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका खड्ड्यामुळे गिरगाव येथील प्रसिद्ध ‘सिंधू कला नाट्य मंडळ’ या दशावतार मंडळाची टाटा मॅजिक गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून, सुदैवाने गाडीतील कलाकार या मोठ्या संकटातून थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव येथील हे नामांकित दशावतार मंडळ आपला नियोजित प्रयोग आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. माजगाव परिसरातील रस्त्यांची सध्या चाळण झाली असून जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे मंडळ भाईसाहेब सावंत समाधी स्थळाजवळ आले असता, चालकाला रस्त्यावरील एका खोल खड्ड्याचा अंदाज आला नाही. शेवटच्या क्षणी हा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात असताना, गाडीचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टाटा मॅजिक रस्त्यावरच जोरात उलटली.
हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी गाडीत अडकलेल्या कलाकारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कलाकारांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
माजगाव परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “रस्त्यांवरील हे खड्डे म्हणजे मरणाचे सापळे बनले आहेत. एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.











