शासकीय यंत्रणेचा फटका
गौरव पोंक्षे माखजन:
रत्नागिरी जिह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांचे पगार रखडले आहेत.यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शालार्थ प्रणाली आणि संच २०२४-२५च्या पदांमध्ये बदल दिसत असल्याने की काही अन्य तांत्रिक कारणामुळे,ऑनलाईन संच मान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षकांची पगार बिले फॉरवर्ड होत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत.ह्याच परिस्थितीला गेले ४ महिने या शिक्षकांना तोंड द्यावे लागत आहे.या आधी ही बिले फॉरवर्ड केल्यावर शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक कोल्हापूर लॉगिन ला बिले जात होती.त्याठिकाणी मंजूर झाल्यावर उशिराने शिक्षकांना पगार मिळत होता.यासाठी देखील शिक्षक वर्गाला फेऱ्या माराव्या लागत होत्या.सध्या शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावरील टॅब बंदकरून ठेवण्यात आला आहे.यामुळे शिक्षकांचे पगार अद्याप झालेले नाहीत.
२०२४-२५ ची संच मान्यता झाल्यावर काही शाळा,कनिष्ठ महविद्यालयात पवित्र प्रणाली मधून शिक्षक भरती झाली आहे.यामुळे संच मान्यता व शालार्थ प्रणालीत पदांमध्ये फरक दिसत आहे.शासकिय यंत्रणेद्वारे भरती झाल्यावर देखील संबंधित कार्यालय पदात फरक दिसतो म्हणून पगार अख्या शाळा,कॉलेज चा रोखून ठेवते हे कितपत योग्य आहे असा सवाल् संतप्त शिक्षक विचारात आहेत.हिच परिस्थिती अख्या महाराष्ट्रात आहे.
ज्या कार्यालयानी ह्या सुधारणा करायला हव्यात त्या,सुधारणा चार चार महिने तशाच ठेऊन शिक्षकांना वेठीस धरले जाते हे कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जात आहे.या गंभीर प्रश्नाकडे शिक्षक आमदार देखील विशेष लक्ष देत नसल्याने शिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
काही ठिकाणी शालार्थ आणि २०२४-२५ च्यासंचमान्यतेत असलेली प्रयोग शाळा सहाय्यकांची संख्या वेगवेगळी दिसत असल्याने,शिक्षकांचे सरसकट पगार रोखुन ठेवण्यात आले आहेत.
वास्तविक पाहता शालार्थ प्रणाली आणि संच मान्यता ह्या दोन्ही एकाच कार्यालयाच्या बाबी आहेत.डिजिटलायझेशन च्या नावाखाली कार्यालया कडून नाहक वेळकाढू पणा करण्यात येत आहे.यामध्ये शिक्षकांना अकारण वेठीस धरण्यात येत आहे.
यामध्ये टप्पा अनुदानावर असलेले शिक्षक हे तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत.यातूनच ते घरचा प्रपंच चालवत असतात.यामुळे सध्या टप्पा अनुदानावरील शिक्षक अडचणीत आले आहेत.रखडलेले पगार तात्काळ करा अशी मागणी संतप्त शिक्षकवर्गातून होत आहे.












