रत्नागिरी जिल्ह्यात १९ ते २१ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता; बागायतदारांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. १८ एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील, मात्र १९ एप्रिलला हलका पाऊस आणि २०-२१ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

आंबा व काजू बागायतदारांसाठी सूचना पावसाचा अंदाज पाहता, काढणीस तयार असलेला आंबा आणि काजू त्वरित उतरवून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केले आहे. हापूस आंब्यातील ‘साका’ रोखण्यासाठी फळांची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ नंतर ‘नूतन’ झेल्याचा वापर करून करावी. तसेच, फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेत प्रति एकर दोन रक्षक सापळे लावावेत आणि गळलेली फळे नष्ट करावीत. नवीन लावलेल्या कलमांना वाढत्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा पाणी देऊन गवताचे आच्छादन करावे.

शेती पिके आणि भाजीपाला व्यवस्थापन काढणीस तयार असलेल्या भुईमूग, भेंडी, मिरची, वांगी आणि टोमॅटो या पिकांची पावसापूर्वीच काढणी करून घ्यावी, जेणेकरून ओलाव्यामुळे नुकसान टाळता येईल. मुग आणि भेंडी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. गरज भासल्यास डायमेथोएट किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिनची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. हळद लागवडीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा योग्य असून, जमिनीची योग्य मशागत करून त्यात चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

पशुधन व कुक्कुटपालनाची काळजी वाढत्या उष्म्यामुळे जनावरांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या चाऱ्यावर गूळ व मिठाचे द्रावण शिंपडावे. कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे आणि शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी या काळात माती परीक्षण करून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.