खेड : खेड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत सायबर ब्लॅकमेलिंगच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलद्वारे काढले होते. त्यानंतर ते फोटो कुटुंबीयांना व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार पैशांची मागणी केली होती. या धमक्यांमुळे पीडितेकडून तब्बल ६८ लाख रुपये उकळण्यात आले होते.
ही घटना ९ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा जानेवारी २०२६ पासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करत असल्याने त्याला अटक करणे अवघड झाले होते.
दरम्यान, १८ एप्रिल २०२६ रोजी आरोपी कामानिमित्त सौदी अरेबियातून मुंबईत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खेड पोलीसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे मुंबईत सापळा रचून आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पीडितेकडून ऑनलाइन माध्यमातून ६८ लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी, आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा मोबाईल तसेच पासपोर्ट जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सनस यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सायबर फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगसारख्या गुन्ह्यांपासून सावध राहावे आणि अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.












