राजापूर (वार्ताहर): राजापूर नगरपरिषद, राजापूर आयोजित आणि नाशिक रॉयल वॉरियर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिमानाची १५० वर्षे’ निमित्त महाराजांच्या पराक्रमाचा वारसा जपत स्वसंरक्षणाचे धडे देणारा विशेष उपक्रम दि. २१ एप्रिल २०२६ रोजी राजीव गांधी क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच कल्पेश भरत भालेकर बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन ब्लॅक बेल्ट थर्ड रँक, यशराज शिंदे, ईश्वर भालेवार, समीक्षा अहिरे, आद्या देव व मुकेश नाचरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नगरसेविका प्रेरणा नार्वेकर, सुयोगा जठार, शबाना मुल्ला, जान्हवी वादक, सान्वी रावण, उर्मिला बाकाळकर, नेहा तानवडे, साजिया काजी, आफरोज झारी उपस्थित होत्या. तसेच उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती श्री. विनय गुरव, सुबोध पवार, ॲड. राहुल तांबे, ॲड. जमीर खलिफे, सुलतान ठाकूर, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सौरभ खडपे, सुभाष बाकाळकर आणि ज्येष्ठ नागरिक श्री. उल्हास खडपे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. हा प्रशिक्षण उपक्रम पुढील दहा दिवस चालणार असून दररोज दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मर्दानी खेळ या अस्सल युद्धकलेच्या माध्यमातून मुलांना स्वसंरक्षणाचे प्रभावी धडे मिळणार असून त्यांच्यात आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्त यांचा विकास होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजापूर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी केले तसेच उपस्थित राजापूर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












